पोल्ट्री व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:09 PM2020-02-12T22:09:47+5:302020-02-12T23:56:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.

Poultry business in crisis | पोल्ट्री व्यवसाय संकटात

पोल्ट्री व्यवसाय संकटात

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोना’चा धसका : जिल्ह्यातील ३०० कोटीची उलाढाल धोक्यात

अमोल अहिरे ।
जळगाव निंबायती : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.
याचा विपरित परिणाम होऊन जिल्ह्यात महिन्याला तीनशे कोटी रुपयांचा होणारा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील चिकन विक्र ीमध्ये जवळपास ७० टक्के घट आढळून आली. शेजारच्या राज्यांमधून होणारी चिकनची मागणी ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली. कोंबडीच्या एका अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येतो.
मात्र सध्या मागणी घटल्याने अंड्याची विक्री ३ रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे उत्पादकांना दररोज हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या काळात हे चित्र बदलले नाही तर पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
कोरोनाचा विषाणू पक्ष्यांच्या कच्च्या मांसापासून प्रसारित होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे, मात्र देशभरात पूर्ण शिजविलेले मांस खाल्ले जात असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा विषाणू असण्याची शक्यता जवळपास नाही. असे असतानाही लोक खोट्या अफवेवर विश्वास ठेवून कोरोना विषाणूच्या संकटाने भयभीत झाले आहेत.

जनजागृती करण्याची मागणी
शेतीपूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले होते, लाखो रुपयांचे बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता, मात्र तोही व्यवसाय आता संकटात सापडला आहे. याची शासनाने तातडीने गंभीरपणे दखल घ्यावी व राज्यातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करुन पोल्ट्री व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी परिसरातील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी दरवर्षी जानेवारी ते एप्रिल हा काळ मंदीचा मानला जातो. त्यातच कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लू या आजारामुळे कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला होता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी. - शशी ढोणे, पोल्ट्री व्यावसायिक, जळगाव निंबायती

गेल्या आठवडाभरापासून कोरोना विषाणूच्या अफवेमुळे चिकनची मागणी ५० ते ६० टक्कांपर्यंत कमी झाली आहे यामुळे चढ्या दराने बॉयलर कोंबड्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे, यामुळे फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. मांसाहारी लोक आता बोकडाच्या मांसाला पसंती देत असल्याने पुढील काळात मटणाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अशरफ शेख,
विक्रेता जळगाव निंबायती.

Web Title: Poultry business in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.