जिल्ह्यातील ‘पिंक व्हिलेज’ पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:04+5:302021-02-05T05:43:04+5:30

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

The 'Pink Village' in the district is under discussion again | जिल्ह्यातील ‘पिंक व्हिलेज’ पुन्हा चर्चेत

जिल्ह्यातील ‘पिंक व्हिलेज’ पुन्हा चर्चेत

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या डोंगर कपारीत वसलेले भिंतघर हे गाव तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महिला सक्षमीकरण आणि कन्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण गाव गुलाबी रंगाने रंगले आणि तेव्हापासून पिंक व्हिलेज म्हणजेच गुलाबी गाव नावारूपास आले. एका प्राथमिक शिक्षकाच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर झळकले. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या गावाला भेट देणार असल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावपळ वाढली असून, लोकप्रतिनिधीही या गावाला भेट देत आहेत.

गुलाबी रंग हा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून मानला जातो. हा संदेश देण्यासाठी गावातील तत्कालीन शिक्षक जितेंद्र गवळी यांनी गुलाबी गावाची संकल्पना गावकऱ्यांना सांगितली आणि अख्खे गाव त्यांच्या विचाराशी सहमत झाले. यासाठी गावाने लोकवर्गणी गोळा केली आणि ८० ते १०० घरांचे अवघे गाव गुलाबी रंगात रंगून गेले. प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्यात आला. गावातील रस्ते स्वच्छ झाले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाचे आंगण स्वच्छ झाले. झाडाझुडपांना लाकडाच्या जाळ्यांचे संरक्षण देण्यात आले. श्रमदानातून गावाचा कायापालट करण्यात आला. येथील शाळा, अंगणवाड्यादेखील गुलाबी रंगाने रंगलेल्या आहेत.

महिला आणि मुलींचा सन्मान करणाऱ्या या गावाची महती जिल्ह्यात आणि नंतर राज्यातही पोहोचली आणि पर्यटकांची पावले या गावाकडे वळली. गावातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे घडते. आदिवासी साहित्यांचे प्रदर्शन गावात पाहायला मिळते. परदेशातूनही अनेक लोक हे गाव पाहाण्यासाठी आले. आता या गावाला राज्यपाल भेट देणार आहेत. येत्या ३ तारखेला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल या गावात आदिवासींचा पाहुणचार घेणार आहेत.

--इन्फो--

इरमाळ, भिंतघर ते गुलाबी गाव

पूर्वी या गावाला ‘इरमाळ’ या नावाने ओळखले जायचे. पूर्वी या गावात येथील सर्व आदिवासी अशिक्षित होते. कुडाच्या व बांबूपासून बनविलेल्या भिंतीच्या घरात ते राहायचे. कालांतराने इरमाळ गावात वाघमारे कुळाचे एक जहागीरदार होऊन गेले. त्यांनी त्या काळी तिथे भव्य असे दगडाच्या भिंतीचे एक मोठे घर बांधलेले होते. त्या दगडाच्या भिंतींनी बांधलेल्या घरावरून या गावाची ओळख ‘भिंतघर’ म्हणून पडली आणि इरमाळ नावाचे हे गाव ‘भिंतघर’ म्हणून आजपावेतो ओळखले जाऊ लागले. कागदोपत्री जरी या गावाचे नाव भिंतघर झालेले असेल, तरी जुनीजाणती माणसे या गावाला इरमाळ म्हणूनच ओळखतात, तर अख्खा महाराष्ट्र या गावाला गुलाबी गाव म्हणून ओळखते.

Web Title: The 'Pink Village' in the district is under discussion again