समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:56 IST2018-09-08T15:52:18+5:302018-09-08T15:56:44+5:30

समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध
नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी समांतर आरक्षण विषयातील जबाबदारी असलेल्या उपसमितीचे उपाध्यक्ष गिरीश महाजन यांची शुक्रवारी (दि.७) जळगाव येथे भेट घेऊन समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करू नये अशी मागणी एका निवदेनाच्या माध्यातून केली आहे.
समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द केल्यामुळे खुल्याप्रवगार्तून अर्ज करून व नोकरी मिळविल्यानंतर मागासवर्गीय उमेदवार जातीचा फायदा घेऊन पदोउन्नती मिळवतील. त्यामुळे खुल्या प्रवगार्तील उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची बाब मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाकांनी पालकमंत्री तथा उपसमिती उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून देत समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले. खुल्या प्रवगार्तील मागासलेल्या उमेदवारांनी अर्ज करून तशी नोकरी मिळवली तर गुणवतेनुसारच पदोउन्नती क्रमप्राप्त असावी. अन्यथा मागासवर्गीय कोट्यातून नोकरी मिळवावी अशी सूचनाही या निवेदनातून करण्यात आली असून राज्य शासनाने समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द केले तर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशाराही यावेळी राज्य सरकारला या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांच्यासह नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील समन्वयक अरुण पाटील, दिव्यांक सावंत, राहुल पाटील, विठ्ठल पाटील,दिपक पाटील, अमोल पाटील,मयुर पाटील,भुषण राणे आदी उपस्थित होते.