नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीही घातकच!

By अझहर शेख | Published: January 7, 2021 11:16 PM2021-01-07T23:16:55+5:302021-01-07T23:22:52+5:30

नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सुश्रूषा करणेही मोठे आव्हान ठरते.   

Nylon maanja are dangerous to humans as well as birds! | नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीही घातकच!

नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीही घातकच!

Next
ठळक मुद्देनायलॉन मांजावर बहिष्कार टाकावाअग्निशमन दलाच्या जवानांनी तारेवरची कसरत मागील वर्षी २१५ पक्षी शहरातून रेस्क्यू

नाशिक : नायलॉन मांजाचा वापर करत पतंगबाजीची हौस भागविणाऱ्यांमुळे पक्ष्यांसह मानवाचाही जीव धोक्यात येत आहे. नायलॉन मांजा हा जसा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो, तसेच तो मानवी जीवितालाही धोका पोहोचवितो, याचा प्रत्यय नाशिककरांना काही दिवसांपूर्वीच आला. यानंतरही शहरात नायलॉन मांजामुळे माणसे जखमी होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. या आठवडाभरात सात पक्ष्यांना जीवदान देण्यास अग्नीशमन दलाच्या जवनांंना यश आले आहे. नायलॉन मांजाचा वापर मानवी जीवनासाठी कसा घातक आहे, याबाबत आपलं पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष पर्यावरणप्रेमीशेखर गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...


* पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा का हवा?
- अजिबात आवश्यक नाही. नायलॉन मांजाचा वापर करणे कायेदेशीर गुन्हा असतानाही नाशिककरांकडून पतंगबाजीसाठी त्याचा अट्टहास का केला जातो? हे अनाकलनीय आहे. नाशिककरांनी आपली मुळ संस्कृती न विसरता नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा. ज्या महिलेला नायलॉन मांजामुळे जीव गमवावा लागला, त्या महिलेच्या लहान चिमुकल्याचा चेहरा डोळ्यांपुढे आणावा, त्यानंतर अजिबात कोणीही नायलॉन मांजा, काचेचा मांजा किंवा चायनीज मांजा वापरण्याचे धाडस करणार नाही, असे मला वाटते. मुळात पतंगबाजीचा आणि मकरसंक्रांतीचा काहीही संबंध नाही, तरीदेखील तो क्षणिक आनंद मिळवायचा असेल तर साध्या दोऱ्याचाही वापर करता येऊ शकेल, नायलॉन मांजाच का हवा? याचा विचार नाशिककरांनी करणे गरजेचे आहे.

* नायलॉन मांजा पक्ष्यांसाठी कसा घातक ठरतो?
- नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना मोठा धोका पोहचतो. त्यांचे पंख कापले जातात तर कधी-कधी पायदेखील कापले जाऊन पक्षी कायमचे जायबंदी होतात. नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सुश्रूषा करणेही मोठे आव्हान ठरते. नायलॉन मांजा केवळ जानेवारी महिन्यातच पक्ष्यांना जखमी करतो, असे मुळीच नाही, तर वर्षभर हा मांजा झाडांवर तसाच असतो आणि सातत्याने पक्षी त्यामध्ये अडकण्याच्या घटना घडतच असतात. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत आण नोव्हेंबरनंतर जानेवारीपर्यंत अशा घटनांमध्ये शहरात वाढ झालेली अग्नीशमन दलाच्या डायरीमधील नोंदींवरुन दिसून येते.

* नायलॉन मांजावरील बंदीबाबत काय सांगाल?
- नायलॉन मांजावर केवळ जानेवारी महिन्यात तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालून काहीही उपयोग होणार नाही, ज्याप्रमाणे सरकारने राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आणली आहे, त्याप्रमाणे आता नायलॉन मांजावर बंदी आणणे गरजेचे आहे. तरच निसर्गाची होणारी हानी आणि नाहक नागरिकांचे जाणारे बळी रोखता येणे शक्य होईल, असे मला वाटते. सध्याची नायलॉन मांजावरील बंदीमुळे धाक निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे, मात्र कायमस्वरुपी या रोगावर हा उपचार ठरु शकत नाही, हेदेखील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी वर्गाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

* नायलॉन मांजाविरुध्द पोलिसांकडून होत असलेली कारवाई कशी वाटते?
- पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नायलॉन मांजा जप्तही होत आहे, मात्र हा मांजा शहरात येतोच कसा? हा देखील एक प्रश्न आहे. या मांजाच्या उत्पादनावरच थेट बंदी घालायला हवी आणि ज्या कारखान्यातून नायलॉन मांजा बाहेर पडतो, ते कारखाने कायमचे बंद करायला हवे. नायलॉन मांजाविक्रेत्यांवर पर्यावरण संवर्धन कायद्यासह सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरणारी कृती केल्याचाही ठपका ठेवत गुन्हा दाखल व्हावा, जेणेकरुन जरब निर्माण होईल.
--
शब्दांकन : अझहर शेख

Web Title: Nylon maanja are dangerous to humans as well as birds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.