येवला पंचायत समितीतील ‘लेटलतिफांना’ नोटीस

By Admin | Updated: March 30, 2017 23:52 IST2017-03-30T23:52:43+5:302017-03-30T23:52:59+5:30

येवला : येवला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लालफितीचा कारभार व लेटलतिफांचा राष्ट्रवादी पाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेदेखील समाचार घेतला.

Notice to 'Letttefan' in Yeola Panchayat Samiti | येवला पंचायत समितीतील ‘लेटलतिफांना’ नोटीस

येवला पंचायत समितीतील ‘लेटलतिफांना’ नोटीस

येवला : येवला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या लालफितीचा कारभार व लेटलतिफांचा राष्ट्रवादी पाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेदेखील समाचार घेतला. येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता थेट पंचायत समितीत बैठक घेऊन २० मिनिटे कर्मचाऱ्यांची वाट बघून पंचायत समितीचे प्रवेशद्वारच बंद केले आणि लेटलतिफांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांना दिले.
बुधवारी राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी पंचायत समिती उपसभापती सेनेचे रुपचंद भागवत यांनी गुरुवारी सलग स्टिंग आॅपरेशन केल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
येवला पंचायत समितीतील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता अचानक पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन १०.२० वाजेपावेतो अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहून पंचायत समिती कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करून घेतले. त्यामुळे उशिरा आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. कार्यालयात असलेल्या चतुर्थ श्रेणीचे चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर आढळले. उपसभापती रुपचंद भागवत यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, ईवद, मनरेगा, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, बांधकाम विभाग व महिला बालकल्याण विभाग यासह सर्वच खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येतात की नाही? हे पाहण्यासाठी अचानक येऊन त्यांनी भेट दिली. त्यांनी प्रत्येक खातेनिहाय कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर जमा करून घेतले. (वार्ताहर)
 

Web Title: Notice to 'Letttefan' in Yeola Panchayat Samiti