सेवाकर वाढीचा महापालिकेला फटका

By Admin | Updated: June 11, 2016 23:47 IST2016-06-11T23:41:31+5:302016-06-11T23:47:03+5:30

अंदाजित खर्चात वाढ : निविदांमध्ये नव्याने दुरुस्ती

NMC to hit the service tax hike | सेवाकर वाढीचा महापालिकेला फटका

सेवाकर वाढीचा महापालिकेला फटका

 नाशिक : केंद्र सरकारने सेवाकरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने त्याचा आर्थिक फटका महापालिकेलाही बसणार असून, अनेक प्रस्तावांच्या प्राकलन (अंदाजित खर्च) दरात वाढ होणार आहे. सेवाकर वाढीनंतर महापालिकेने आता उद्यान देखभालीसह काही कामांच्या निविदांमध्ये नव्याने दुरुस्ती सुचविली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर केल्यानुसार वाढीवसेवा कर व कृषी कल्याणकर दि. १ जूनपासून देशभर लागू झाला. केंद्र सरकारने सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत नेला आहे. याशिवाय ०.५ टक्के कृषी कल्याण अधिभार तर ०.५ टक्के स्वच्छ भारत अभियानासाठी लागणारा अधिभार लागू असल्याने एकूण सेवाकर १५ टक्के जाऊन पोहोचला आहे. वाढीव सेवाकर लागू झाल्याने त्या अंतर्गत येणाऱ्या सेवाही महागल्या आहेत. महापालिकेमार्फत विविध कामांच्या निविदा काढल्या जातात. प्रस्तावित कामांचे प्राकलन तयार करताना त्यात सेवाकरही अंतर्भूत केला जातो. महापालिकेमार्फत अनेक प्रस्तावांच्या निविदाप्रक्रिया सुरू आहेत, तर काही निविदांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वाढीव सेवाकर हा संबंधित ठेकेदाराकडूनच वसूल केला जात असल्याने प्राकलन दरही त्यांच्याकडून वाढीव दरानेच नमूद केले जातील. परिणामी, अंदाजित खर्च वाढणार असल्याने निविदांचे दर जादा जाण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचा सारा आर्थिक बोजा महापालिकेच्याच खजिन्यावर पडणार आहे. वाढीव सेवाकर लागू झाल्यानंतर महापालिकेने आता कार्यवाहीत असलेल्या निविदांची फेरपडताळणी सुरू केली असून, त्यानुसार प्राकलन दरातही बदल केले जात आहेत. याशिवाय, यापुढे नव्याने निविदाप्रक्रिया राबविताना त्यात वाढीव १५ टक्के सेवाकर अंतर्भूत करून प्राकलने तयार केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: NMC to hit the service tax hike