राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:29 PM2023-08-07T16:29:12+5:302023-08-07T16:30:13+5:30

नाशिक जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणार.

NCP and state government are determined to solve the problem of unemployed says Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

googlenewsNext

नाशिक-नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध आहे, असं प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

नाशिक जिल्ह्यात विविध विकासाची कामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकल टुरिझमला अधिक वाव आहे. यापुढील काळात 'आयटी हब' सह अनेक उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करून नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. तसेच राज्यसरकारच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकरी देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट फूड वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर रोजगार मेळाव्याचे उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असून हे काम अविरत सुरु राहील असंही छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

नोकरी महोत्सवात ५० हून अधिक कंपन्या संस्थांचा सहभाग

या नोकरी महोत्सवात पुणे आणि नाशिकमधील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायनान्स सेवा या क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी घेऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्यावतीने सहकार्य करण्यात आले.

Web Title: NCP and state government are determined to solve the problem of unemployed says Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.