Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 21:39 IST2025-07-29T21:38:29+5:302025-07-29T21:39:44+5:30
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून, आता पुरोहितांच्या दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आहे. जिवे मारण्याच्या धमकीसह जिवाला धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल देण्यात आल्या आहेत.

Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
Nashik Kumbh Mela Latest News: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पुरोहित संघाच्या दोन्ही गटांतील वाद उफाळला असून, रविवारी फलक लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. पुरोहित संघाच्या एका गटाने जीविताला धोका असल्याची तक्रार तर दुसऱ्या गटाने संस्था कार्यालयातून हाकलून देत शिवीगाळसह मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुरोहित संघातील वाद रविवारपासून हातघाईवर आला आहे. दोन्ही गटांकडून नवीन कार्यकारिणी जाहीर करताना विरोधी गटातील प्रमुखांना आपल्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पुरोहित संघाच्या जागेवर फलक लावण्यावरून वादाचे स्वरूप संघर्षाने घेतले आहे. त्यामुळे दोन्ही गट चर्चेत आले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
कार्यालयातून हाकलून लावतानाच मारण्याची धमकी
गत ४५ वर्षांपासून असलेल्या पुरोहित संघाच्या कार्यालयात नवीन पुरोहित संघ कार्यकारिणी लावण्याच्या वादातून प्रकार उद्भवल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
शिवीगाळ करण्यासह धक्काबुक्की करून संस्था कार्यालयातून हाकलून देतानाच मारण्याची धमकीदेखील देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पिता-पुत्राकडून सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या जिवास धोका असल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नवीन गटाकडून करण्यात आली आहे.
२९ जणांनी केली अंगावर चाल
रविवारी (२७ जुलै) सायंकाळी ७.३० वाजता नवीन पुरोहित गटातील तब्बल २९ जण अंगावर चाल करून आल्याचा आरोप जुन्या गटाने केला आहे.
दहशत निर्माण करून वंशपरंपरेचे असलेले बैठकस्थान बळजबरीने येऊन अनधिकृत बोर्ड लावून झटापट करून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यातून दहशतीसह जीविताला धोका निर्माण झाला आहे.
नित्य कामात अडथळा आणून बदनामी करत धमक्या देण्यात आल्याने गुंड प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा; अन्यथा पोलिस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा जुन्या गटाच्या वतीने करण्यात आला आहे.