नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:39 IST2018-02-26T22:39:19+5:302018-02-26T22:39:19+5:30
शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे

नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. सातपूर, इंदिरानगर, अंबड, गंगापूर, सरकारवाडा, मुंबईनाका, म्हसरूळ, पंचवटी, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, सोनसाखळी ओरबाडणे, दुचाकी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गंगापूर पोलीस ठाणे
येथील गंगापूररोडवरील कमल रो-हाउस सोसायटीमधील आठ क्रमांकाच्या बंगल्यात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दागिन्यांसह लॅपटॉप असा एकूण एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तम संपतराव दळवी (६०) यांच्या मालकीच्या रो-हाउसमध्ये चोरट्यांनी शनिवारी (दि.२४) रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रवेश के ला. घरामधील प्रत्येकी २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी, ब्रेसलेट असे ८० हजारांचे दागिने व १५ ग्रॅमच्या सोन्याच्या ३५ हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, पंधरा हजारांचा लॅपटॉप, ३० हजारांची रोकड, असा एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
सातपूर पोलीस ठाणे हद्द
नाशिक : येथील शिवाजीनगर परिसरातील भाग्यलक्ष्मी निवासमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे ४० हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीनगर, सातपूर येथील रहिवासी प्रशांत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित चोरट्यांनी मीनाताई ठाकरे उद्यानाजवळील शिवाजीनगरमधील भाग्यलक्ष्मी निवासात प्रवेश करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व दहा हजाराचे सोन्याचे पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची वीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी, पाच हजाराचा मोबाइल असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.
अंबड पोलीस ठाणे हद्द
सिडको परिसरातील सावतानगर भागात बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबीयाच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.
रितेश सुरेश जगताप (३०.रा. राणेनगर) यांचे सासू-सासरे सावतानगर येथे राहतात. ते काही कामानिमित्त दहीसर, मुंबई येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश करत २२ हजारांची १५ ग्रॅम वजनाचे दागिने, चांदीचे जोडवे, साडेचार हजारांची रोकड, असा एकूण २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.