Nashik: दोन मुलांसह बापाने विहिरीत मारली उडी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा टोकाचा निर्णय; नाशिक जिल्ह्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:47 IST2025-11-26T16:45:54+5:302025-11-26T16:47:36+5:30
Nashik Crime News: दोन चिमुकल्यांसह एका पित्याने विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Nashik: दोन मुलांसह बापाने विहिरीत मारली उडी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा टोकाचा निर्णय; नाशिक जिल्ह्यात खळबळ
ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या काजी सांगवी शिवारात हे घडले. दिघवद येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी मारली आणि आयुष्य संपवले.
सचिन हिरे असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रज्ञा सचिन हिरे (वय १० वर्षे) आणि प्रज्वल सचिन हिरे (वय ४ वर्षे) या दोन मुलांसह त्यांनी आयुष्याचा शेवट केला.
तिघांचा शोध घेताना अडचणी
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हिरे यांनी घराजवळ असलेल्या विहिरीतच आत्महत्या केली. तिघांनी विहिरीत उडी मारल्याचे कळताच कुटुंब हादरले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चांदवडमधीलच रायपूर येथील स्कूबा डायव्हरला बोलवण्यात आले. विहिरीत भरपूर पाणी आणि गाळ होता. त्यामुळे तिघांचा शोध घेताना अडचणी आल्या. बराच काळ विहिरीत शोध घेतल्यानंतर तिघांचे मृतदेह मिळाले.
मृतदेह बाहेर काढण्यानंतर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलिसांनी याबद्दल काहीही माहिती दिली नाही. पण, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा गावात सुरू आहे.