Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:21 IST2025-10-13T19:20:03+5:302025-10-13T19:21:48+5:30
Nashik Crime Latest: आमच्या नादी कोणी लागत नाही, म्हणत पोलिसांना आव्हान देणाऱ्या पवन पवारविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
Nashik News: 'कोणी लागत नाही नादी...' असे रील तयार करीत व्हायरल केल्याप्रकरणी जेलरोड येथील माजी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदाराविरुद्ध सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोडपोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पवन पवारसह संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे व त्यांचे साथीदार सोहेल पठाण, तथागत, आशिष वाघमारे, नीलेश भोसले यांनी त्यांचे फोटो वापरून या रीलद्वारे 'कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, मोजीवाले गँगस्टर...' अशा शब्दांत रील तयार केले होते.
पवन पवार झाला भूमिगत
पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजाश्रय उद्ध्वस्त करीत संबंधित नेते, पुढारी, पदाधिकारी यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पवन पवार देखील शहरासह जिल्ह्यातून गायब झाले असून त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत. त्यांच्या घरी, संपर्क कार्यालयावर पोलिसांनी यापूर्वीच धाड टाकली आहे.
१२ सप्टेंबर रोजी पोस्ट
सामान्य जनतेमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने पवन पवार व त्यांच्या साथीदारांनी रील सोशल मीडियावर मागील महिन्याच्या १२ तारखेला व्हीडिओ व्हायरल केला होता. समाजात वेगवेगळ्या गटात द्वेष, खोटी अफवा किंवा असंतोष निर्माण करणारे वक्तव्य असलेले व्हिडीओ पोस्ट केला होता.