Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:11 IST2025-09-29T16:09:23+5:302025-09-29T16:11:47+5:30
Crime news: पहाटे सव्वापाच वाजता शंभरफुटी रस्त्यावरून पीडित विद्यार्थिनी ही कुटुंबासह जात होती. यावेळी पाठीमागून एक रिक्षा येऊन त्यांच्याजवळ थांबली.

Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
Nashik Crime News : वडाळागाव परिसरातील एका रस्त्यावरून जाणाऱ्या महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीची सराईत गुन्हेगाराने छेड काढून त्याच्या साथीदाराच्या मदतीने बळजबरीने रिक्षामध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रसंगी संशयित आरोपी शैकत सुपडू शहा आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विनयभंग, पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे सव्वापाच वाजता शंभरफुटी रस्त्यावरून पीडित विद्यार्थिनी ही कुटुंबासह जात होती. यावेळी पाठीमागून एक रिक्षा येऊन त्यांच्याजवळ थांबली. रिक्षामध्ये संशयित शौकत शहा आणि त्याचा एक साथीदार होता. शहा याने पीडित विद्यार्थिनीला रिक्षाच्या पुढील सीटवर ओढण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा साथीदार तिच्या मैत्रिणीकडे झेपावला.
मुलींनी 'वाचवा, वाचवा' अशी आरडाओरड करताच, मागून येणाऱ्या त्यांच्या मैत्रिणी वेगाने रिक्षाच्या दिशेने धावल्या. त्यावेळी पीडितेला जबरदस्ती रिक्षात ओढले जात असतानाच तिला त्यांनी बाहेर खेचून काढले. या झटापटीत मुलींनी स्वतःचा बचाव करत सुटका केली.
शहा याने पीडितेला चापट मारून अश्लील शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचा साथीदार अंगावर धावून गेला व विद्यार्थिनींशी झटापट केली, त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशी कृत्य केले.
संशयितावर यापूर्वीही गुन्हे
मुलींनी पळत जाऊन पुढे आई आणि त्यांच्या गल्लीतल्या महिलांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी शौकत शहा आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहा हा फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. तो अमली पदार्थाच्या नशेत असतो आणि त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.