Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:39 IST2025-10-05T16:38:54+5:302025-10-05T16:39:54+5:30
Nashik Crime news Latest: नाशिकमधील पंचवटी परिसरात सागर जाधव याच्यावर दुचाकीवरू आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. यात भाजपच्या नेत्यालाही अटक केली गेली आहे.

Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
Nashik Crime News Marathi : फुलेनगर परिसरात निकम व उघडे टोळीत गेल्या काही वर्षापूर्वी झालेल्या पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून संशयित गुन्हेगार सागर जाधव याच्यावर मागील महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार कटाचा म्होरक्या फरार आरोपी विकी उत्तम वाघ (३४, रा. फुलेनगर) यास गुंडाविरोधी पथकाने तर दीपक सुनील वीर यास मखमलाबाद परिसरातून पंचवटी गुन्हे शोध पथकाने शनिवारी (४ ऑक्टोबर) बेड्या ठोकल्या.
पंचवटीतील राहुलवाडी भागात १७ सप्टेंबर रोजी रात्री सागर जाधव याच्यावर दुचाकीस्वारांनी येऊन गोळीबार केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.
यामध्ये भाजपचे माजी गटनेता नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांनाही कटात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. वाघ व वीर यांच्या अटकेने आता आरोपींची संख्या १५वर पोहोचली आहे. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यांनी प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना कळविले. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
एका पथकाने वणी गाठले तर दुसऱ्या पथकाने लखमापूर फाट्यावर सापळा रचला होता. शनिवारी दुपारी वाघ हा दुचाकीने (एमएच १५ -जेआर ८२१९) लखमापूर फाट्याकडून भरधाव कोशिंबे गावाच्या दिशेने जात होता.
पथकाने त्याचा पाठलाग सुरू करीत त्याला कोशिंबे गावात शिताफीने पकडले. त्याच्या अंगझडतीतून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यास पंचवटी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
दुचाकीने करायचा भटकंती
१७ सप्टेंबर रोजी राहुलवाडीत गोळीबार करून फरार झालेला म्होरक्या विकी वाघ हा दुचाकीने भटकंती करीत होता. त्याने गुन्ह्यात ज्या दुचाकीचा वापर केला त्याच दुचाकीने अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये प्रवास करीत होता. यामुळे त्याचा निश्चित ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता.
आणखी काही संशयित रडारवर
फुलेनगर परिसरात गोळीबाराच्या घटनेच्या तपासात धक्कादायक बाब म्हणजे नव्याने आणखी काही संशयितांची नावे पुढे आली आहेत. त्यात काहींचे गोळीबारापूर्वी व घटना घडल्यानंतर संशयित आरोपींसोबत मोबाइलवर वेळोवेळी झालेले संभाषणाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे आता त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.