Nashik: मंडळ अधिकाऱ्यांनाच डम्परखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 21:07 IST2025-11-15T21:07:13+5:302025-11-15T21:07:50+5:30
Nashik Crime News: अधिकाऱ्यांनी परवाना मागितल्यानंतर त्यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न केला. यात अधिकारी थोडक्यात बचावले.

Nashik: मंडळ अधिकाऱ्यांनाच डम्परखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरारक घटना
नाशिक शहरातील म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडवरील म्हसरूळ पोलिस चौकीजवळ गौण खनिज वाहन तपासणीदरम्यान गौण खनिज वाहतूक परवाना मागितल्याचा राग येऊन तिघा संशयितांनी दोघा मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर स्वतःच्या ताब्यातील मालवाहू वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यात दोघे मंडल अधिकारी बालंबाल बचावले. नंतर संशयित गौण खनिज भरलेले वाहन घेऊन तेथून पसार झाले.
घटनेचा हा थरार गुरुवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता घडला. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मानसिंग परदेशी यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिघा अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डम्पर थांबवला आणि कागदपत्रे मागितली
पोलिसांनी सांगितले की, गौण खनिज तपासणी पथकातील शरद सांडुगीर गोसावी, नामदेव श्रावण पवार व रामसिंग परदेशी वाहन तपासणी करीत होते. कणसरा चौकाकडून येणाऱ्या मालवाहू वाहनास थांबविले.
चालकाकडे कागदपत्रे, तसेच गौण खनिज वाहतूक परवाना देण्याची मागणी केली असता चालकाने फोन करून त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले.
चालकाला खाली उतरवले अन्...
घटनास्थळी आलेल्या दोघांनी चालकाला गाडीतून खाली उतरवून घेतले अन् नंतर स्वतः वाहनाच्या स्टेअरिंगवर बसला व सोबतच्या दोघांना वाहनात बसण्याचे सांगितले. त्याच वेळी रस्त्यावर गौण खनिज कारवाईसाठी थांबलेल्या दोघा मंडल अधिकाऱ्यांवर वाहन घालून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक सचिन मंद्रपकर यांनी दिली.
विनापरवाना गौण खनिज वाहतूक
पंचवटी /परिसरातील हिरावाडी, आडगाव, तसेच म्हसरूळ / परिसरातील रस्त्यावर दैनंदिन सकाळ व सायंकाळी गौण खनिज वाहनांची वर्दळ असते.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर चिखल लावलेला असतो तर काही वाहनांना नंबर प्लेट नसल्याने विनापरवाना गौण खनिज वाहतूक केली जात असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांना कोणाचा अभय असा सवाल व्यक्त केला जात आहे.