Nagar Panchayat Election Result 2022 : सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांना 'या' ठिकाणी स्वकियांच्या पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:03 IST2022-01-20T12:53:27+5:302022-01-20T13:03:26+5:30
निवडणुकीपूर्वी ज्या माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा बोलबाला होता त्यांना शिवसेनेने सर्वाधिकार दिले. त्यांनी काँग्रेसशी आघाडी करत शिवसेनेच्या सर्वाधिक ...

Nagar Panchayat Election Result 2022 : सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांना 'या' ठिकाणी स्वकियांच्या पराभवाचा धक्का
निवडणुकीपूर्वी ज्या माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा बोलबाला होता त्यांना शिवसेनेने सर्वाधिकार दिले. त्यांनी काँग्रेसशी आघाडी करत शिवसेनेच्या सर्वाधिक सहा तर काँग्रेसच्या दोन अशा आठ जागा निवडून आणल्या मात्र त्यांना एक जागा बहुमताला कमी पडली तर त्यांचे मुलाचा एक मताने धक्कादायक पराभव झाला. त्यांचेकडे सुरुवातीपासून इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होती. त्यातच त्यांनी भाजपसोबत शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न केला अन् तोच अंगाशी येत त्यांना सत्तेच्या डावात बहुमतापासून दूर राहावे लागले.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या पत्नीला सलग दुसरा पराभव बघावा लागला. भाजपसाठी सेनेने चार ठिकाणी उमेदवार दिले नाही एक ठिकाणी सेनेच्या उमेदवाराची माघार घेत काँग्रेसला चाल दिली मात्र त्या पैकी तीन जागा भाजपने जिंकल्या. राष्ट्रवादीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विकासाच्या अजेंड्यावर स्वतंत्र निवडणूक लढवत सर्वाधिक जागा लढवल्या मात्र त्यांनाही बहुमतापर्यंत पोहचता आले नाही गेल्यावेळी तीन जागा होत्या त्या यावेळी पाच झाल्या यावर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले.युवा नेते अविनाश जाधव यांनी सर्वाधिक मताने विजय मिळविला. मात्र पॅनलचे नेते माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते यांच्या भावजयी तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नरेश देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपची भूमिका ही सुरवातीपासून धरसोडची राहिली स्वबळ आघाडी की युती यात भाजप अडखळत राहिली. शिवसेना सोबतच्या युतीच्या अगदी माघारी पर्यंत चाललेल्या घोळात ऐनवेळी भावाभावांमध्ये एकमत न झाल्याने युती ही झाली नाही, अन मतविभागणी होत भाजपचे गटनेते प्रमोद देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झाला.
भाजपचे चार नगरसेवक निवडून आले, त्यात काही उमेदवारांकडे भाजपने ऐनवेळी दुर्लक्ष केले. त्यांची ही भूमिकाही अनाकलनीय ठरली मात्र तरीही पत्रकार नितीन गांगुर्डे यांनी एकाकी लढत देत दणदणीत विजय संपादन केला. तर ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या दोन्ही जागा अपक्ष लढवण्याचा भाजपचा डाव त्यांचेवर उलटला. तरीही त्रिशंकू स्थितीत भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने चार जागा लढवत दोन जागा जिंकत चांगले यश मिळवले असले तरी गेल्या वेळी राष्ट्रवादी सोबत लढत मिळविलेल्या सात जागांवरून दोनवर काँग्रेसची घसरण झाली आहे. शिवसेनेबरोबर जात कमी जागा वाट्याला आल्याने काँग्रेसचे नुकसान झाले. यावेळी एकही अपक्षास मतदारांनी संधी दिलेली नाही.