डिकीमध्ये मृतदेह, पालघरच्या जंगलात विल्हेवाट; नाशिक पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:27 IST2025-12-09T19:27:19+5:302025-12-09T19:27:50+5:30
नाशिकमधील व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

डिकीमध्ये मृतदेह, पालघरच्या जंगलात विल्हेवाट; नाशिक पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा
Palghar Crime: मालमत्तेच्या जुन्या वादातून नाशिक येथील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी त्या व्यक्तीचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळील जंगलात फेकून दिला होता. मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना पालघरपोलिसांनी अटक केली आहे. हा अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
वैतरणा धरणाजवळ आढळला मृतदेह
मोखाडा पोलिसांना १२ जुलै रोजी वैतरणा धरणाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता, ज्याचे पाय वेलीने बांधलेले होते. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने, तपास पथकांनी तब्बल एका महिन्यानंतर, १३ ऑगस्ट रोजी, मृताची ओळख पटवली. मृत व्यक्ती इगतपुरी येथील रहिवासी शरद बोडके (वय ३१) असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.
मालमत्तेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात हा मालमत्तेच्या वादातून झालेला खून असल्याचे उघड झाले आहे. मृत शरद बोडके याचा मुख्य आरोपी संतोष धात्रक याच्यासोबत मालमत्तेवरून जुना वाद होता.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "मृत बोडके हा वारंवार आरोपी संतोषच्या कुटुंबीयांना त्रास देत असे आणि दादागिरी करत असे. एकदा वादातून त्याने आरोपीच्या आई-वडिलांना मारहाण केली होती आणि आरोपीच्या मामाचा पायही फ्रॅक्चर केला होता."
नाशिकमध्ये हत्या, पालघरमध्ये विल्हेवाट
या त्रासाला कंटाळून आणि कुटुंबीयांवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपी संतोष धात्रक याने आपल्या चार मित्रांसोबत शरद बोडकेला संपवण्याचा कट रचला. योजनेनुसार, संतोषने बोडकेला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका निर्जनस्थळी पार्टीसाठी बोलावले. तिथे त्यांनी एकत्र दारू प्यायली. नशेत असताना या सर्वांनी बोडकेला मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गाडीच्या डिकीत लपवला आणि नाशिकहून सुमारे १५० किलोमीटरचा प्रवास करून तो पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळील जंगलात फेकून दिला.
पाच आरोपींना अटक, कार जप्त
पालघर पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष धात्रक (३६) आणि त्याचे मित्र शिवराम वाघ (२९), गोकुळ बेंडकोळी (२९), गणेश बेंडकोळी (२२), आणि संजय पोटकुळे (३०) या सर्व नाशिक रहिवासी असलेल्या पाचही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी हत्येनंतर मृतदेह फेकण्यासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. कुटुंबावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेला हा थंड डोक्याने केलेला खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची क्रूर पद्धत पाहून पोलीसही चक्रावले आहेत.