मुंबई-आग्रा महामार्ग : वाहनचालक-पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:22 IST2018-08-30T21:19:52+5:302018-08-30T21:22:48+5:30
उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष उलटले आहे; मात्र या दीड किलोमीटर अंतरावरील उड्डाणपूलाच्या कामाला प्राधिकरणाला ‘मुहूर्त’ लाभलेला नाही.

मुंबई-आग्रा महामार्ग : वाहनचालक-पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत
नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर वाहनधारकांसह पादचाºयांची जीवघेणी कसरत सुरूच आहे . महामार्गावर अनेकांचा बळी गेला असून बहुतांश लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष उलटले आहे; मात्र या दीड किलोमीटर अंतरावरील उड्डाणपूलाच्या कामाला प्राधिकरणाला ‘मुहूर्त’ लाभलेला नाही.
महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून रोज लहान मोठे अपघात घडतात .या अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांसह, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर सरकारकडून उड्डाणपूल मंजूर करण्यात आला; मात्र तो अद्याप कागदोपत्रीच आहे.
उड्डाणपूलाचे भूमीपूजन थाटामाटात करण्यात आले; मात्र प्रत्यक्षरित्या कामाला सुरूवात झाली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन अद्याप किती बळी जाण्याची प्रतीक्षा करत आहे? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. महामार्ग ओलांडताना शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांची तारंबळ उडते. या गोंधळात अनेकदा अपघात घडतात. तसेच महामार्गालगत कन्नमवार पुलापासून पुढे कोणार्कनगरपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची वर्दळ असते.
असे आहेत महामार्गाचे ‘ब्लॅक स्पॉट’
महामार्गावर कन्नमार पुलाजवळ हिरे महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय असून येथून टकलेनगरकडे ये-जा करण्यासाठी हजारो विद्यार्थी दिवसभर रस्ता ओलांडतात. हा मोठा ब्लॅक स्पॉट आहे. तसेच तपोवन चौफुली, औरंगाबादनाका, अमृतधाम चौफुली, रासबिहारी चौफुली, जत्रा चौफुली, आडगाव येथील वैद्यकिय महाविद्यालय चौफूली, आडगाव ट्रक टर्मिनल चौफुली हे महामार्गावरील अत्यंत गंभीर असे ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.