अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:51 IST2025-10-13T19:50:14+5:302025-10-13T19:51:01+5:30
Nashik: नाशिकमधील वाढती गुन्हेगारी सरकारच्याही चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या काही महिन्यात नाशिकमध्ये हत्यांचा घटना घडल्या असून, भाईगिरीला जोर आला आहे. अशातच शाळेतील मुलांच्या बॅगेत कोयते सापडल्याने खळबळ उडाली.

अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
Nashik News: मोठ्यांकडून भाईगिरीच्या नावाखाली सुरू असलेली गुंडगिरी हळूहळू लहानग्यापर्यंत झिरपू लागली आहे. त्याचाच प्रत्यय देणारा प्रकार नाशिक शहरातमध्ये घडला आहे. पोलिसांनी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळच्या उड्डाणपुलाखाली संशयित दोन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील 'बॅग'ची तपासणी केली. यावेळी त्यांच्या दप्तरमध्ये चॉपर, कोयता सापडला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले, तर दुसऱ्या विधीसंघर्षित बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अल्पवयीनांमध्ये अजूनही भाईगिरीचे 'फॅड' संपलेले नाही, हे यावरून पुन्हा अधोरेखित झाले.
शंभर रुपयाचा चॉपर, दुसऱ्याच्या बॅगेत कोयता
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या टागोरनगरमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये शंभर रुपयांचा चॉपर तर दुसऱ्या एका सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत कोयता आढळून आला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याबाबत दोघांना विचारणा केली असता 'हे शस्त्र आमचे नाही, मित्रांनी आमच्याकडे ठेवायला दिले होते....' असा बनाव करण्याचादेखील प्रयत्न केला.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणले. तेथे चौकशी करून त्यांच्या पालकांना बोलावून घेत त्यांच्याही ही बाब लक्षात आणून देण्यात आली. याबाबत दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी सामान्य असून, त्यांनी ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने जवळ बाळगली होती? याचा तपास पोलिस करत आहेत.
'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लालाच वाकुल्या'
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. ते आता हात जोडून 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला...' असे म्हणू लागले आहेत.
त्यांचे रील्स सोशल मीडियावर 3 तसेच वृत्तवाहिन्यांवरून व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र अल्पवयीनांमध्ये अजूनही 'भाईगिरी'ची क्रेझ कमी होताना दिसत नसल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.