मनसे जिल्हाध्यक्ष कोंबडे भाजपात

By Admin | Updated: November 18, 2016 00:14 IST2016-11-18T00:13:10+5:302016-11-18T00:14:57+5:30

सिन्नर येथील जाहीर सभेत प्रवेश

MNS District President, Congress | मनसे जिल्हाध्यक्ष कोंबडे भाजपात

मनसे जिल्हाध्यक्ष कोंबडे भाजपात

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती कायम असून, गुरुवारी पक्षाचे आणखी एक जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. सिन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत त्यांनी हा प्रवेश केला.
कोंबडे यांच्यासमवेत मनसेचे माजी सिडको विभागप्रमुख मोहन मोरे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून मनसेला गळती लागली असून, अनेक चाळीस पैकी अठरा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील काही जण भाजपात, तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांनीदेखील इंजिन यार्डात सोडून कमळ हाती धरले आहे. राज ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला जिल्हाप्रमुखपदापर्यंत संधी मिळाली. परंतु आता भाजपासारख्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात सामील होणार असल्याची प्रतिक्रिया कोंबडे यांनी व्यक्त केली. सामान्यजन भ्रष्टाचाराने पिचलेले आहेत, अशा स्थितीत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार करीत असलेल्या भूमिकेमुळे भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मनसेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. रतनकुमार इचम यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी मनसेचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर, मनसेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: MNS District President, Congress