खंडणी, अपहरण आणि मृत्यूने शेवट; ११ लाखांसाठी झटापट झाली अन् व्यापाऱ्याचा गेला जीव; नाशिक हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:50 IST2026-03-13T14:46:28+5:302026-03-13T14:50:06+5:30
'आयजी'चे पथक असल्याचं भासवून व्यापाऱ्याचं अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

खंडणी, अपहरण आणि मृत्यूने शेवट; ११ लाखांसाठी झटापट झाली अन् व्यापाऱ्याचा गेला जीव; नाशिक हादरलं
Nashik Crime:नाशिकमध्ये तोतया पोलिसांनी केलेल्या अपहरणाचे नाटक केल्यामुळे एका व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील अधिकारी असल्याचे सांगून गुटखा व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीने २५ लाखांची खंडणी मागितली. मात्र, पैशांच्या देवाणघेवाणीवेळी झालेल्या वादात हृदयविकाराचा झटका आल्याने व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने देवळा आणि सटाणा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
मयत व्यापारी जब्बार चांद तांबोळी (५५, रा. पिंपळगाव वाखारी) हे बुधवारी रात्री आपल्या पिकअप वाहनातून गुजरातहून प्रतिबंधित गुटखा घेऊन देवळ्याकडे येत होते. सापुतारा मार्गे येत असताना मध्यरात्री कळवण तालुक्यातील एकलहरे शिवारापासून एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांचा पाठलाग सुरू केला. भऊर फाट्याजवळ या स्कॉर्पिओमधील तिघांनी तांबोळी यांचे वाहन अडवले.
तोतया पोलिसांचा बनाव आणि अपहरण
स्कॉर्पिओमधून उतरलेल्या भामट्यांनी "आम्ही आयजींच्या पथकातील माणसे आहोत, तुमचा गुटखा पकडला आहे," अशी धमकी दिली. त्यांनी तांबोळी आणि चालक इलियास बागवान यांना मारहाण करत बळजबरीने स्कॉर्पिओमध्ये बसवले. ही केस मिटवण्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर ११ लाख रुपये देण्याचे ठरले.
पैशांच्या देवाणघेवाणीवेळी वाद
तांबोळी यांनी आपला मुलगा साहिल याला पैसे घेऊन सटाणा तालुक्यातील ठेंगोडे परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे मुलगा पैसे घेऊन पोहोचला खरा, मात्र तिथे संशयित आरोपी आणि तांबोळी यांच्यात पैशांवरून जोरदार बाचाबाची आणि झटापट झाली. या तणावपूर्ण वातावरणात तांबोळी यांच्या छातीत अचानक तीव्र कळ आली आणि ते जागीच बेशुद्ध पडले. व्यापाऱ्याची प्रकृती खालावल्याचे पाहून तोतया पोलिसांनी खंडणीचे पैसे न घेताच स्कॉर्पिओ सोडून तिथून पळ काढला. मुलाने वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांची कारवाई आणि संशयित अटकेत
या घटनेनंतर देवळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि महेश भामरे या तिघांविरुद्ध अपहरण, खंडणी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विलास जगताप आणि महेश भामरे यांना अटक करण्यात आली आहे. तिसरा संशयित मोहम्मद शफीक याचा पाय फ्रॅक्चर असल्याने तो सध्या उपचार घेत आहे.