महालक्ष्मी, रेणुका माता मंदिरांची रंगरंगोटी

By Admin | Updated: September 26, 2016 01:47 IST2016-09-26T01:46:43+5:302016-09-26T01:47:11+5:30

माळावरची देवी : देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

Mahalakshmi, Renuka Mata Temple's Rangarangoti | महालक्ष्मी, रेणुका माता मंदिरांची रंगरंगोटी

महालक्ष्मी, रेणुका माता मंदिरांची रंगरंगोटी

देवळाली कॅम्प : रेस्ट कॅम्प रोडवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका माता मंदिर, लॅमरोड येथे जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी माता मंदिरासह सर्वत्र नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
देवळाली कॅम्प-भगूर रेस्ट कॅम्प रोडवर पुरातन काळात भृगू ऋषींनी श्री रेणुका माता देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. मंदिरासमोर असलेले पाण्याचे बारव हे त्वचारोगापासून मुक्ती देणारे म्हणून ओळखले जाते. श्री रेणुका माता मंदिर हे नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांसह विविध ठिकाणच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची हजारोंच्या संख्येने दररोज गर्दी होत असते. तसेच नवरात्रीनिमित्त परिसरात मोठी जत्रादेखील भरली जाते.
नवरात्रीनिमित्त मंदिराची स्वच्छता करून मंडप उभारण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनरांगेची सोय करत १९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून नवरात्रीनिमित्त श्री रेणुका माता मूर्तीचे रंगकाम दिनेश करंजकर करत आहे. नवरात्रीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे मंदिराचे पुजारी देवीदास चिंगरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

कालिका मातेचा देखावा
लॅमरोड सहा नंबर नाक्यासमोर जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून श्री महालक्ष्मी माता मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात मूर्ती उभारून मूर्तीची रंगरंगोटी करण्यात येत आहे. गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर, रविवार बाजार भागातील श्री मरीमाता मंदिर, शितळामाता मंदिर आदि मंदिरात नवरात्रीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर लॅमरोड युवक मित्रमंडळाने ५२ शक्तिपीठांपैकी सातवे शक्तिपीठ म्हणून ओळख असणाऱ्या गुजरात राज्यातील पावागड येथील कालिका मातेच्या मूर्तीचा देखावा साकारला आहे.
 

Web Title: Mahalakshmi, Renuka Mata Temple's Rangarangoti