विद्युत खांबांमुळे जीवितास धोका

By Admin | Updated: August 24, 2016 22:32 IST2016-08-24T22:30:04+5:302016-08-24T22:32:20+5:30

पिंपरवाडी : वीज वितरण कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष; दुरुस्तीची मागणी

Life risk due to electrical pillars | विद्युत खांबांमुळे जीवितास धोका

विद्युत खांबांमुळे जीवितास धोका


 सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) शिवारात वीज वितरण कंपनीचे खांब व विद्युत तारा अक्षरश: जमिनीवर लोळत असल्याचे चित्र असून, त्यामुळे जनावरे व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार सरपंच सविता पवार, उपसरपंच विजय गुरुळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी पिंपरवाडी शिवारात वादळी वाऱ्यामुळे ७ ते ८ विद्युत खांब वाकले होते, तर काही उन्मळून जमिनीवर पडले होते. ग्रामस्थांनीच पडलेले खांब दगडांचा आधार देत जमिनीपासून कसेबसे वर केले होते. यासंदर्भात पिंंपरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वावी वीज उपकेंद्रात तोंडी व लेखी तक्रार केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून सदर खांब पूर्ववत करण्याची मागणी केली जात होती. मात्र त्याकडे वीज उपकेंद्राने दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. दुरुस्तीचे काम करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने व वीजवाहक तारांमध्ये विद्युतप्रवाह सुरू असल्याने धोका निर्माण झाला आहे. जमिनीवर पडलेल्या वीजवाहक तारांचा शॉक लागून भटके कुत्रे व एका वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वीज खांब दुरस्तीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वावी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर एका अधिकाऱ्याचीही बदली झाली. नवीन आलेल्या अधिकाऱ्यानेही अद्याप सदर बाब गांभीर्याने न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पडलेल्या विद्युत खांबांचा तलाठ्याने पंचनामा करून अहवाल पाठविला आहे. मात्र त्यानंतरही पिंपरवाडी ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. पडलेल्या विद्युत खांबामुळे व वीजवाहक तारांमुळे जीवितहानी झाल्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, अशा आशयाचे पत्र पिंपरवाडी ग्रामपंचायतीने वावी वीज वितरण कार्यालयास दिले आहे. वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या जीविताशी न खेळता तातडीने पडलेले विद्युतखांब व विद्युत तारांची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच सविता पवार, गुरुळे यांच्यासह श्रावण गायकवाड, कैलास काकड, गणेश गायकवाड, गोरख मुंगसे, हरिभाऊ कापसे, पोपट गुुरुळे, रतन हाडोळे, सुदाम हाडोळे, साहेबराव पवार, रामकृष्ण शिरसाट, केशव गायकवाड, प्रकाश मुंगसे, अंबादास हाडोळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Life risk due to electrical pillars