कुंभमेळा : २६९ एकर जागा तात्पुरती अधिग्रहित

By Admin | Updated: August 21, 2014 00:14 IST2014-08-20T23:53:30+5:302014-08-21T00:14:19+5:30

साधुग्रामचा मार्ग मोकळा

Kumbh Mela: 269 acres of temporary land acquisition | कुंभमेळा : २६९ एकर जागा तात्पुरती अधिग्रहित

कुंभमेळा : २६९ एकर जागा तात्पुरती अधिग्रहित

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्यासाठी राज्य सरकार व महापालिका एकमेकांवर चालढकल करीत असताना, आता त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनेच साधुग्रामसाठी २६९ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याचा अध्यादेश जारी केला असून, येत्या दोन महिन्यांत सदरची जागा ताब्यात घेऊन ती महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिल्याने येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील कार्यवाही सुरू होण्याची चिन्हे आहेत. साधुग्रामसाठी तीनशे एकर जागा कायमस्वरूपी असावी, अशी साधू-महंतांची मागणी आहे. त्या अनुषंगाने सिंहस्थ कृती आराखड्यातही जागा संपादनाबाबतचा प्रश्न यापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील शिखर समितीच्या बैठकीत चर्चिला गेला. परंतु तपोवनातील शेतकऱ्यांचा जागा देण्यास तीव्र विरोध असून, काही जागांवर तर पक्की बांधकामेही झालेली आहेत. अशा परिस्थितीत साधुग्रामसाठी जागा कोणी संपादित करावी यावरून राज्य सरकार व महापालिका यांच्यात कलगीतुरा रंगला होता. नोव्हेंबर २०१३ मध्ये राज्य सरकारने आदेश काढून महापालिकेवर त्याची जबाबदारी ढकलली, तर महापालिकेनेही महासभेत ठराव करून शासनाकडे भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भूसंपादन करणे आता कायदेशीर, व्यावहारिक व तांत्रिकदृष्ट्याही शक्य नसल्याने अखेर शासनाने साधुग्रामसाठी २६९ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याचे ठरविले.
गेल्या तीन दिवसांपासून त्यासाठी मेळा अधिकाऱ्यांनी मंत्रालयात तळ ठोकल्यानंतर बुधवारी शासनाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला व जिल्हाधिकाऱ्यांनी जागा अधिग्रहित करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, त्यासाठी जमीनमालकांना नोटिसा, त्यांच्या हरकती व सूचनांची सुनावणी करून जागा अधिग्रहित करण्यात यावी, असे या अध्यादेशात म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या ताब्यात जागा हस्तांतर करण्याचे आदेशही यात देण्यात आले आहेत.

Web Title: Kumbh Mela: 269 acres of temporary land acquisition