वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

By Admin | Updated: August 5, 2016 02:10 IST2016-08-05T02:10:02+5:302016-08-05T02:10:26+5:30

वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

Independent Vidarbha issue for time-consuming: Raj Thackeray | वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

 नाशिक : विधिमंडळात विरोधकांनी इतर विषयांना हात घालू नये, म्हणून स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची आणि लक्ष दुसरीकडे वळवायचे, हाच भाजपाचा उद्योग सुरू आहे. वेळकाढूपणासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र सोडले. मनसेची भूमिका अखंड महाराष्ट्राचीच असल्याचा पुनरुच्चारही राज यांनी यावेळी बोलताना केला.
दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य केले. राज यांनी सांगितले, राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय समोर असताना आणि शिक्षण, आरोग्य यामध्ये गोंधळाची स्थिती असताना विधानसभेत या विषयांवर चर्चा होण्याऐवजी वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. राज्यात भाजपाच्या हाती सत्ता आहे. तर मग विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी आणि विकासासाठी यांना थांबविले कुणी? विरोधकांनी इतर विषयांवर चर्चा करू नये म्हणून गेल्या तीन दिवसांपासून हा सारा गोंधळ सुरू आहे. भाजपा माध्यमांना आणि जनतेलाही खेळवत आहे. न केलेल्या कामांवर चर्चा होऊ नये यासाठी लक्ष वळविण्याचा प्रकार सुरू आहे. विदर्भाला सवलती दिल्या जात आहेत तर मग बोंब कशाला मारतात, असा सवालही राज यांनी केला. कॉँग्रेसही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने बोलू लागली आहे. ही सारी मिलिभगत असल्याचा आरोप राज यांनी केला. मुख्यमंत्री अजूनही विरोधी पक्षातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे ते रोज स्वत:ला आपण मुख्यमंत्री आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी चिमटे काढत असतात, असा टोलाही राज यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Web Title: Independent Vidarbha issue for time-consuming: Raj Thackeray