व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:10 IST2025-12-01T10:09:46+5:302025-12-01T10:10:32+5:30
गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले.

व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
नाशिक - देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे खालप चौफुलीलगत राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने व्हाटसअॅप स्टेटसवर स्वतः सह बायको-मुलांच्या फोटोंसह खाली भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकत आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली व नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत पती गोविंद शेवाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळी ६:५१ वाजता गृहरक्षक दलात कर्मचारी असलेल्या गोविंद शेवाळे यांनी व्हॉट्सअॅपवर स्वतःच्या कुटुंबीयांच्या फोटोखाली भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस टाकले होते. हे स्टेटस परिसरातील मित्रमंडळी व नातेवाइकांनी बघितल्यानंतर सर्वजण अचंबित झाले व याबाबत सरपंच लंकेश बागुल यांना माहिती देण्यात आली. गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले. बागुल यांनी घटनेची माहीती देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षकासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या वेळेपर्यंत घटनेची माहिती वेगाने सर्वत्र पसरली.
पोलिसांनी घरात प्रवेश केला असता गोविंद बाळू शेवाळे (४०) हे दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, तर पत्नी कोमल (३५), मुलगी हर्षाली (९) आणि मुलगा शिवम (२) हे तिघेही मृतावस्थेत आढळले. नाशिक येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसराची तपासणी केली आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कारण अद्याप अस्पष्ट
चारही मृतदेह पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी देवळा रुग्णालयात रवाना करण्यात आले. डॉक्टरांकडून मिळणारा अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यानंतरच मृत्यूच्या कारणाबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. शेवाळे कुटुंब शांत स्वभावाचे होते, असे स्थानिकांनी सांगितले आहे. आर्थिक किंवा कौटुंबिक वादाची तक्रार नसताना असा प्रकार घडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत. रविवारी सकाळी ६:५१ वाजता गोविंद शेवाळे यांनी व्हॉटसअॅप स्टेटसवर आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट ठेवली होती. ह्या पोस्टमुळे घटना पूर्वनियोजित होती का? याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
प्राथमिक तपासानुसार, पतीने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. पतीनेच पत्नीला आणि दोन्ही मुलांना जीवे ठार मारले असावे, असा अंदाज आहे. घरातील प्रत्येक पुरावा तपासला जात आहे. डिजिटल मोबाइल डेटा, स्टेटस पोस्ट व घटनास्थळी मिळालेली माहिती यावरून तपासाला दिशा मिळत आहे. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. - सार्थक नेहेते, पोलिस निरीक्षक, देवळा