Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:34 IST2025-12-12T10:29:41+5:302025-12-12T10:34:05+5:30
Husband killed wife Nashik Crime: नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीची पतीनेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती नितीनने मध्यरात्री शीतलची हत्या केली आणि फरार झाला.

Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
Nashik Crime News Latest: चारित्र्याच्या संशयावरून पतीने क्रूरपणे पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घडली आहे. शीतल भामरे असे मृत महिलेचे नाव आहे, तर संशयित आरोपी पती नितीन भामरे हा खून केल्यापासून फरार आहे. मयत शीतल हिच्या नणंदेमुळे हत्येची ही घटना समोर उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहणाऱ्या नितीन भामरे याचा पत्नी शीतल यांच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते.
वाद झाला आणि नितीनने शीतलचा जीव घेतला
दरम्यान, गुरूवारी रात्री दोघांमध्ये याच मुद्द्यावरून वाद झाले. नितीनने शीतल यांना मारहाण केली. तिथेच तो थांबला नाही, तर त्यानंतर दोरीने शीतल यांचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर संशयित नितीन याने घटनास्थळावरून पळ काढला.
बाहेरून लावली कडी, नणंदेला आला संशय
आरोपी नितीन भामरे याने पळून जाताना घराला बाहेरून कडी लावली. यामुळे शीतल यांच्या नणंदेला काहीतरी आक्रीत घडल्याचा संशय आला. त्यामुळे मध्यरात्रीच तिने घराचा दरवाजा उघडला. आत डोकावून पाहताच नणंदेला धक्का बसला.
वहिनीला मृतावस्थेत बघून नणंद जोराने ओरडली. त्यानंतर घरातील आणि आजूबाजूचे लोकही तिथे आले. यानंतर तत्काळ पंचवटी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितीन भामरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,फरार आरोपीचा शोध पंचवटी पोलिसांकडून घेण्यात येत आहे.