महामार्गावरील उड्डाणपुलावर माय-लेक अपघातात ठार; वाहनचालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:30 IST2018-08-29T22:24:39+5:302018-08-29T22:30:10+5:30
सुदैवाने यावेळी ज्येष्ठ नागरिक भटुलाल कासार यांनी पूल ओलांडला असल्याने ते बचावले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर थांबण्याऐवजी वाहन घेऊन सुसाट गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

महामार्गावरील उड्डाणपुलावर माय-लेक अपघातात ठार; वाहनचालक फरार
नाशिक: कमोदनगर परिसरातून सिडकोमधील सुंदरबन कॉलनीमध्ये जाण्यासाठी थेट उड्डाणपूल ओलांडणाऱ्या तांबट व कासार कुटुंबातील सदस्यांना मुंबईकडून नाशिक शहराकडे भरधाव जाणा-या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चार वर्षीय मुलासह मातेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. सुदैवाने यावेळी ज्येष्ठ नागरिक भटुलाल कासार यांनी पूल ओलांडला असल्याने ते बचावले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर थांबण्याऐवजी वाहन घेऊन सुसाट गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमोदनगर परिसरातून सिडकोकडे जाताना बुधवारी (दि.२९) उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत शीतल आशिष तांबट (३०, रा. गोपालकृष्ण चौक) व त्यांचा मुलगा कुणाल तांबट हे जागीच ठार झाले तर यशोदा भटुलाल कासार (६५) यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तसेच मयत शीतल यांचे सासरे सुभाष चुनीलाल तांबट (५५) यांनाही वाहनाची धडक बसल्याने तेदेखील गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी उड्डाणपुलावर एकच धाव घेतली तसेच अंबड पोलीस ठाण्यालाही अपघाताची माहिती कळविण्यात आली. घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक अपघातग्रस्त वाहनासोबत फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, राकेश शेवाळे आदिंनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरून अपघातग्रस्त वाहनाच्या वर्णनाचा संदेशही प्रसारित करण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी माय-लेकाला मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.