अपंगांच्या संस्था होणार अनुदानित

By Admin | Updated: August 2, 2014 01:21 IST2014-08-02T01:14:09+5:302014-08-02T01:21:18+5:30

शिवाजीराव मोघे : सातपूर येथील ‘नॅब’च्या कार्यक्रमात केली घोषणा

Handicapped institutions will be supported | अपंगांच्या संस्था होणार अनुदानित

अपंगांच्या संस्था होणार अनुदानित

सातपूर : देशात अपंगांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या सर्वाधिक संस्था आपल्या राज्यात असून, बहुतांश विना अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. अशा विना अनुदानित संस्था अनुदानित करण्यासाठी शासनपातळीवर लवकरच निर्णय घेण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब) युनिट महाराष्ट्र संचलित सातपूर येथील चंद्रभागाबाई नरसिंगदासजी चांडक (सिन्नर) बहुविकलांग केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मोघे पुढे म्हणाले, नॅबच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. नॅब या संस्थेने विश्वासार्हता मिळविली असल्याने संस्थेला समाजाचा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुविकलांग विद्यार्थ्यांनी स्त्रीभू्रणहत्त्येवर नाट्य, मल्लखांब प्रात्यक्षिके, बहुविकलांग नृत्य यांसह विविध सांस्कृतिक सादर केलेले पाहून मंत्री शिवाजी मोघे भारावून गेले.
यावेळी द्वारकानाथ चांडक, किशोर केला, सुभाष झंवर, सीएट कंपनीचे राधेश्याम केडिया, अभय पंचाक्षरी, उद्योजक राजेश उपासनी आदि देणगीदारांचा तसेच विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बहुविकलांग विद्यार्थ्यांना सीडी प्लेअरचे वाटपही करण्यात आले. कर्णबधिर, अंध व बहुविकलांग प्रकल्पाची माहिती डेफब्लार्इंड प्रकल्पाचे अध्यक्ष अशोक बंग यांनी दिली. प्रास्ताविक नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राधाकिसन चांडक होते.
यावेळी व्यासपीठावर नॅब इंडियाचे सचिव के. रामकृष्णन, तसेच भारत परदेशी, पद्मश्री निरंजन पंड्या, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त बाजीराव जाधव, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, समाजकल्याण उपआयुक्त राजेंद्र कलाल, काशीनाथ गवळे, समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी, वंदना कोचुरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुगंधा शुक्ल यांनी केले. नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले.
याप्रसंगी सूर्यभान साळुंखे, व्ही. एच. पाटील, मंगला कलंत्री, संजीवनी वंडेकर, प्राचार्य ज्योती आव्हाड, वर्षा चकोर, संपत जोंधळे, जितेंद्र गोस्वामी, अ‍ॅड. भागचंद चुडीवाल, सतीश ठाकरे, रजनी लिमये, विद्या फडके, डॉ. सिंधू काकडे आदिंसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Handicapped institutions will be supported