Maratha Reservation : 'सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:50 IST2021-06-21T17:36:59+5:302021-06-21T17:50:49+5:30
Maratha Reservation : नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Maratha Reservation : 'सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय'
नाशिक - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमेवत झालेल्या चर्चेत आपल्या प्रमुख मागण्यांची पूर्तता होण्याचे ठोस आश्वासन मिळाले आहे. त्यासाठी, प्रशासकीय पातळीवरील पूर्तता करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी राज्य सरकारने मागितला आहे. पण, आपण 21 दिवसांऐवजी 1 महिन्यांचा कालावधी सरकारला देत आहोत. त्यामुळे, जर 1 महिन्यात आपल्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्हाला पुढील आंदोलनाची भूमिका ठरवावी लागेल, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, 23 जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय करण्यात येणार आहे. ओबीसींप्रमाणेच मराठा समाजालाही सवलती देण्यासाठी सरकार तयार आहे. तसेच, 2185 विद्यार्थ्यांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरही सरकारने 21 दिवसांचा कालावधी मागितला असून कंटेम्ट ऑफ कोर्ट न होता, विशेष बाब म्हणून किंवा सुपर न्यूमेररीचा वापर करुन त्यांना नियुक्त्या देण्याबाबत अभ्यास करण्यात येत असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. नाशिक येथील आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजेंनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
आरक्षणासाठीच्या पर्यायावरही चर्चा
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत... असाच पर्याय असल्याचे संभाजीराजेंनी नाशिकमध्ये बोलताना म्हटले. तसेच, राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
बहुजन समाज एकत्र बांधण्याचा प्रयत्न
आपण इथं आलात, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. नाशिकच्या पुण्य नगरीतून मी सांगू इच्छितो की, मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये, मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे. संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले. नाशिकमधील आंदोलनात उपस्थितांशी बोलताना संभाजीराजेंनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.