सोनसाखळीची लूट : नाशिकमध्ये महामार्गावर मोटार अडवून चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:21 IST2018-03-15T19:21:02+5:302018-03-15T19:21:02+5:30
मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सोनसाखळीची लूट : नाशिकमध्ये महामार्गावर मोटार अडवून चालकाला मारहाण
नाशिक : चारचाकी वाहनाचा दुचाकीवरून पाठलाग करत मोटार अडवून चालकाला मारहाण करून गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरून द्वारकेच्या दिशेने कुटुंबासमवेत गिरीश रघुनाथ गावित (४५, रा. तपोवन लिंकरोड) हे त्यांच्या मोटारीने (एमएच १५, ईएन २२९९) मुलीला घेऊन जात होते. दरम्यान, संशयित विक्रांत परदेशी (रा. विसे मळा, गंगापूररोड) याने दुचाकीवरून (एमएच १५, बीझेड ६९७३) पाठलाग करत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार अडविली. मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात के ली. बेदम मारहाणीदरम्यान, संशयित परदेशी याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी परदेशीविरुद्ध गावित यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयिताचा पूर्ण पत्ता नसल्यामुळे तो अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही. पोलिसांकडून शोध सुरू आहे.
शहरामध्ये जबरी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. रस्त्याने मार्गस्थ होणेही वाहनचालकांना मुश्कील झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटनांबरोबरच चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरीच्या घटना घडत असून, चोरटे पसार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.