तपासावरच निकालाचे भवितव्य अवलंबून

By Admin | Updated: January 9, 2015 00:41 IST2015-01-08T23:50:58+5:302015-01-09T00:41:28+5:30

उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

The future of the judgment depends on the investigation | तपासावरच निकालाचे भवितव्य अवलंबून

तपासावरच निकालाचे भवितव्य अवलंबून


नाशिक : गुन्ह्याचा तपास पोलीस कसा आणि किती दक्षपणे करतात यावर त्या गुन्ह्याचा निकाल व आरोपीचे भवितव्य अवलंबून असते. न्यायदेवता ही समोर येणाऱ्या पुराव्यानुसार न्याय देत असते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना न्यायालयात टिकतील असे सबळ पुरावे गोळा करावे, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी दिला. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये एल. व्ही. केळकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कायदेशीर लढाई यशस्वी करण्याचे तसेच तळागाळातील लोकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास जिवंत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. अनेक घटना या दिवसाढवळया तसेच लोकांसमोर घडतात, त्यानुसार साक्षीदार भक्कम असतात, तरीही गुन्हेगार निर्दोष सुटतात़ त्यावेळी न्यायदेवतेवरचा लोकांचा विश्वास उडतो; मात्र तसे नसून न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी असते. ती व्यक्ती नाही, तर पुरावे पाहून न्याय देत असते़ साक्षीदार जरी भक्कम असले, तरी न्यायालयासमोर सबळ पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते.
नागरिकांनी साक्षीदार होण्यासाठी स्वत:हून पुढे येणे, त्यांचे मनोबल वाढविणे, त्याने जबाब फिरवू नये वा फितूर होऊ नये यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे हेदेखील चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचे काम असते, असेही निकम यांनी सांगितले़ यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस व महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अधिकारी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)

Web Title: The future of the judgment depends on the investigation