...अखेर वसंत गितेंचा पदाचा ना‘राजीनामा’
By Admin | Updated: November 4, 2014 00:31 IST2014-11-04T00:29:10+5:302014-11-04T00:31:30+5:30
मनसेत फूट : पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा सत्र

...अखेर वसंत गितेंचा पदाचा ना‘राजीनामा’
नाशिक : नाशिकमधील मनसेचे सर्वेसर्वा मानले गेलेले नेते माजी आमदार वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पाठोपाठ त्यांच्या समर्थनार्थ दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे कृष्णकुंजवर पाठविले आहेत. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाचे पोस्टमार्टेम करण्यासाठी येत्या बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार असताना, दोनच दिवसांपूर्वी ही उलथापालथ घडल्याने राजगडाला धक्का बसला आहे.
वसंत गिते हे भाजपा-सेनेच्या संपर्कात असल्याची यापूर्वीच चर्चा होती. स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यास दुजोरा दिला असला, तरी गिते यांनी मात्र त्याचा इन्कार केला असून, आपण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे; परंतु पक्ष सोडलेला नाही, असे सांगितले. असे असले तरी गिते आपल्या किमान वीस नगरसेवकांना घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने अन्य नेत्यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेऊन तटबंदी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता असल्याने नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता.
(पान २ वर)
मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्याबरोबर असलेले गिते हे पक्षातील सर्वेसर्वा होते; परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांनी नाशिकमध्ये आणि विशेषत: महापालिकेतील सत्तेची सूत्रे पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकले यांच्याकडे दिली आणि त्यानंतर गिते यांची नाराजी सुरू झाली होती. दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गिते यांनी राज यांना भेटण्याचे टाळले होते. यानंतर राज यांनी गिते यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेची मुंबईत व्यवस्था केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांच्यासह नाशिकमधील सर्वच जागांवर पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राज हे नाशिकमध्ये येऊन मोठे फेरबदल करणार असल्याची चर्चा असताना गिते यांनी राजीनामा दिला. आठ वर्षे आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली; परंतु वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव प्रदेश सरचिटणीस पदावर काम करू शकत नसल्याने आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती गिते यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे.
राजीनाम्यानंतर गिते हे कार्यकर्त्यांना सामोरे गेले नाही. तथापि, मुंबई नाका येथील त्यांच्या कार्यालयात कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी महापौर अशोक मुर्तडक यांनी नगरसेवकांची पालिकेत ओळखपरेड घेतली. कोणताही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नसल्याचे मुर्तडक आणि शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी सांगितले.