शेतकरी आंदोलकांची वाहने पोलिसांनी नाशिकच्या वेशीवर रोखली, सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:39 IST2019-02-20T19:12:08+5:302019-02-20T19:39:42+5:30
फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे. या सरकारने केवळ विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप अजित नवले यांनी केला.

शेतकरी आंदोलकांची वाहने पोलिसांनी नाशिकच्या वेशीवर रोखली, सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप
नाशिक - सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच नाशिकचे वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यात आलेले आहे. अहमनगर वरून येणाऱ्या शेतकऱ्यांना सिन्नर परिसरात रोखण्यात आले आहे. तसेच पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण शेतकऱ्यांना म्हसरूळ येथे रोखण्यात आले आहे, असा आरोप किसान सभेचे अजित नवले यांनी केलेला आहे. फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे. या सरकारने केवळ विश्वासघात केलेला आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
जेव्हा शेतकरी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात जमले आणि ताकद दिसली तेव्हा पालक मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी या असे सांगितले. पूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क करत होतो. तेव्हा ते वेळ देत नव्हते, अशी टीकाही नवले यांनी केली आहे. एक-दीड तास मागेपुढे जरी झाले तरी लाल वादळ थांबणार नाही. विधानसभेला लाल वादळ घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. गोदाकाठच्या पवित्र भूमीतून हे वादळ अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, असे आंदोलन नेतृत्व करणारे आमदार जे. पी. गावित, अजित नवले यांनी स्पष्ट केले.
बुधवारी विधानसभेला घेराव
किसान सभेचा लॉँग मार्च येत्या बुधवारी (दि.२७) मुंबईत धडकणार आहे. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी क ष्टकरी वर्ग सहभागी होणार आहे. शेतक-यांसह आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढला जात आहे. बुधवारी मोर्चेकरी विधानसभेला घेराव घालणार आहे.
चोख बंदोबस्त असा...
लॉँगमार्चसाठी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन सहायक आयुक्तांसह पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, १०० महिला-पुरु ष पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकडीसह शीघ्रकृती दलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. तसेच शहर पोलीसांच्या दिमतीला नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका-यांसह दीड हजार पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त आहे.