Farmer : बंपर लाभ मिळवून देणाऱ्या कांद्याप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता; बंगल्यावर साकारली प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 20:20 IST2022-01-18T20:19:52+5:302022-01-18T20:20:46+5:30
नाशिक - आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सारे आयुष्यच बदलून जाते. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असतात; परंतु ...

Farmer : बंपर लाभ मिळवून देणाऱ्या कांद्याप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता; बंगल्यावर साकारली प्रतिकृती
नाशिक - आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सारे आयुष्यच बदलून जाते. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असतात; परंतु त्या घटकांप्रती कृतज्ञता बाळगणारे निराळेच. येवला तालुक्यातील धनकवडी येथील शेतकरी साईनाथ व अनिल जाधव या बंधूंना दोन वर्षांपूर्वी कांदा पिकाने चांगला हात दिला आणि त्यातूनच त्यांचा टुमदार बंगला उभा राहिला. मग या बंधूंनी कांद्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बंगल्यावर चक्क १५० किलो वजनाच्या कांद्याची प्रतिकृती साकारली. घरावर दिमाखात मिरवणारी ही कांद्याची प्रतिकृती पंचक्रोशीत चर्चेचा विषय न झाली तर नवलच!
धनकवडी येथील जाधव बंधू यांना ३० एकर शेतजमीन असून हे दोघे बंधू आपली वडिलोपार्जित शेती करतात. हा भाग प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने कांदा हेच मुख्य पीक आहे. याच कांदा पिकाला २०१९-२० या वर्षी चांगले दिवस आल्याने जाधव बंधूंना कांद्याचे चांगले उत्पादन आले. खर्च वजा जाता चांगला नफा झाल्याने त्यांनी बंगला बांधण्याचा निर्णय घेतला आणि बंगल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी, ज्या कांद्यामुळे चांगले दिवस आले त्याचीच प्रतिकृती घरावर बसवण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर लासलगाव येथील करागीरकडून १५० किलो वजनाचा कांदा बनवून घेऊन तो बंगल्यावर बसवण्यात आला. यासाठी त्यांना साधारणतः १७ ते १८ हजार रुपये खर्च आल्याचे जाधव बंधू यांनी सांगितले.