सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

By Admin | Updated: July 31, 2014 00:48 IST2014-07-31T00:02:32+5:302014-07-31T00:48:49+5:30

सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

Farm damage due to the closure of the dam in Surgana taluka | सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

सुरगाणा : तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार सुरूच असून, घाटमाथा परिसरात मुसळधार वृष्टी झाल्याने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पांगारबारी गावाजवळ हिरमाळ शिवारात चार वर्षांपूर्वी बांधलेला बंधारा फुटल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबला नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, जोरदार वृष्टीमुळे तालुक्यात घाटमाथ्यावरील बोरगाव येथे सर्वाधिक ९२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे घाटमाथ्यावरील पांगारबारी गावाजवळील हिरमाळ शिवारातील चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला बंधारा फुटला. त्यामुळे आलेल्या पुरात काशीनाथ काळू बोंबले व गंगाराम काळू बोंबले या दोन्ही भावांची भातशेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. आणखी कुणाकुणाच्या शेतीचे नुकसान झाले आहे काय याबाबत तूर्तास माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, अद्यापही पावसाची संततधार सुरूच असून, आज सर्वाधिक पावसाची नोंद बोरगाव येथे ९२ मि.मी. तर त्या खालोखाल सुरगाणा येथे ७१.५ मि.मी., मनखेड येथे ५७.७ मि.मी., बाऱ्हे येथे ५६.५ मि.मी. आणि उंबरठाण येथे ३८ मि.मी. याप्रमाणे झाली. जोरदार पावसामुळे तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे भरले असून, नदी-नाले, ओहोळांना पूर आले, तर काही ठिकाणी फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. सापुतारा घाटात दरड कोसळल्याने सुरागाणामार्गे गुजराथकडे वाहतूक सुरू होती. पाऊस सुरू झाल्यापासून ३० जुलैपर्यंत तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी ४४१.८०८ मि.मी. एवढी झाली आहे. गतवर्षी आजच्याच दिवसापर्यंत सुरगाणा येथील एकूण पावसाची
नोंद १०१५ मि.मी. झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Farm damage due to the closure of the dam in Surgana taluka