मालेगावमध्ये दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, पोलिसांनी अटक केलेले दोघे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 00:35 IST2025-11-01T00:34:18+5:302025-11-01T00:35:28+5:30
पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथका २९ ऑक्टोबर रोजी रात्री महामार्गावर दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले.

मालेगावमध्ये दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, पोलिसांनी अटक केलेले दोघे कोण?
मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत दोघा संशयितांकडून १० लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मध्य प्रदेशातील नाजिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (रा. मोमिनपुरा) व मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपूर, मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अपर पोलिस अधीक्षक संधू व मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत बाविस्कर, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथका २९ ऑक्टोबर रोजी रात्री महामार्गावर दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले.
पोलिसांनी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांना हटकत तपासणी केली. यावेळी संशयित मोहम्मद जुबेर याच्याजवळ असलेल्या एका सॅकमध्ये ५०० रुपयांच्या ८ लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या आढळून आल्या. तर जोडीदाराच्या तपासणीत त्याच्या खिशात २ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या.
पोलिसांनी १० लाखांच्या बनावट नोटा व दोघांजवळून मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. उपनिरीक्षक तुषार भदाणे तपास करीत आहेत.
मालेगाव कनेक्शनबाबत तपास
या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३(५) अन्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना ३० ऑक्टोबर रोजी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ८ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन्ही संशयितांनी या बनावट नोटा कोठून आणल्या व मालेगाव येथे कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याचा तपास करीत आहेत.