खेळताना पाय घसरून काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळला; आठ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 21:13 IST2025-10-05T21:09:24+5:302025-10-05T21:13:50+5:30
पंचवटी येथे विहिरीत कोसळल्याने एका आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खेळताना पाय घसरून काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळला; आठ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू
Nashik Accident: नाशिकच्या पंचवटी येथील हिरावाडी अयोध्यानगरी परिसरातील कालिका नगर भागात असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या मुलाचा पाय घसरल्याने तो तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना शनिवारी (दि. ४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला पाण्यातून बाहेर काढले. मात्र नाका तोंडावाटे पाणी गेल्याने संदीप दिवेंद्र परिहार (८) याचा बुडून मृत्यू झाला.
शिवनगर-कालिकानगर भागात राहणारे एका बांधकाम स्थळावरील वॉचमन दिवेंद्र परिहार यांचा मुलगा संदीप हा त्याच्या काही मित्रांसोबत नेहमीप्रमाणे थीम पार्कजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर खेळण्यासाठी शनिवारी दुपारी गेला होता. यावेळी त्याचा अचानकपणे पाय घसरला आणि तो जवळच असलेल्या उघड्या विहिरीत कोसळला. पावसामुळे विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. ही घटना लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केली.
काही मुलांनी घराकडे येऊन लोकांना घटनेबाबत सांगितले. यामुळे आजूबाजूला असलेल्या रहिवाशांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. माजी नगरसेविका प्रियांका माने यांनीही घटनास्थळी येत पोलिस व अग्निशमन दलाची मदत मागितली. मुलगा विहिरीत पडलेला असल्याचे बघून अग्निशमन दलाला माहिती कळवण्यात आले.
काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी गळाच्या सहाय्याने संदीपला ओढून बाहेर काढले. यावेळी तो बेशुद्ध पडलेला होता. त्याच्या पोटात गेलेले पाणी काढून तातडीने त्यास रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.