Due to rain, roads re-pit | पावसामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात
पावसामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात

नाशिक : शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिकेकडून असे खड्डे बुजविण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक भागात खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असूनदेखील महापालिका प्रशासन याबाबत सुन्न झाल्याचे दिसत आहे.
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्ड्यांच्या प्रमाणात हमखास वाढ होत असते. त्यामुळे पावसाळा व खड्डे यांचे नाते घट्टच असल्याचे दिसते; मात्र महापालिकेकडून अनेक प्रयत्न करूनदेखील हे खड्ड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. शहरातील रिंगरोड असो की कॉलनीरोड अशा सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे सध्या बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला; मात्र खड्ड्यांमध्ये टाकलेल्या कचमुळे वेगळाच त्रास सहन करावा लागला. तसेच काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून आले. शहरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील सर्वच भागांत खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिकेने यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य
नाशिक-पुणे महामार्गावर सतत झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डेच खड्डे झालेले बघावयास मिळत आहेत. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे बघायला मिळाले होते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. यानंतर पालिकेकडून या खड्ड्यांमध्ये मुरूम माती टाकण्यात आली, तर काही ठिकाणी डांबर पण खूप प्रमाणात टाकल्याचे दिसत आहे. सतत झालेल्या पावसामुळे शहरात पुन्हा खड्डे तयार झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. त्यात नाशिकरोड ते द्वारका महामार्र्गावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाल्याचे दिसत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
डागडुजीचे काम निकृष्ट
पावसामुळे खड्डे तयार होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी पालिक ा असे खड्डे बुजविण्यासाठी देखावा करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणाºया शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभाव खड्डे बुजविताना दिसत आहे. खड्डे बुजवित असताना महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी नसल्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे ते खड्डे बुजविताना डागडुजीचा मुलामा लावत आहे.
महिनाभरातच रस्त्यांची दुरवस्था
शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. राष्टÑपतींच्या नाशिक दौºयादरम्यान ओझर ते नाशिक-पुणे महामार्ग चकाचक करण्यात आला होता; परंतु महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title:  Due to rain, roads re-pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.