दिंडोरीत जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

By Admin | Updated: April 8, 2017 23:43 IST2017-04-08T23:42:44+5:302017-04-08T23:43:06+5:30

दिंडोरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Dindori district bank managers encircle | दिंडोरीत जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

दिंडोरीत जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

 दिंडोरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शिक्षकांचे वेतन एक महिन्यांपासून अदा न केल्याने शिक्षक संघाने जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकास घेराव घातला व दीड तास चर्चा केली. पगाराची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बँकेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शाखा व्यवस्थापकांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना शिक्षक आंदोलनाबाबत कल्पना दिली.
संचालक गणपतराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शिक्षकांशी संपर्क साधून मंगळवारी (दि. ११) पगाराची रक्कम अदा करण्यात येईल, असा शब्द दिल्याने शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले. वेतन नसल्याने गृहकर्ज, शिक्षण कर्ज, इतर प्रापंचिक देणी थकल्याने शिक्षकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे दिंडोरी येथील रंगानाना संकुलमधील जिल्हा बँकेत खाते असून, नाशिक जि.प. मार्फत दरमहा शिक्षकांच्या पगाराची रक्कम या बँकेत वर्ग करण्यात येते. फेब्रुवारी २०१७ या महिन्याचे वेतन सुमारे साडेतीन कोटी रु पये दि. ६ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषदेने या बँकेतील गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडून शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी धनादेश देण्यात आला. मात्र बँकेत पैसे नसल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर संपूर्ण मार्च महिना उलटून गेला तरीही वेतन अदा करण्यात आलेले नाही. यानंतर शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक सेना या संघटना पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्य.अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच एनडीसीसी बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे, संचालक गणपतराव पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून खडसावले. संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगाराचे इतर चेक क्लिअरिंगसाठी वापरल्याचे उघडकीस आले.
यावेळी झालेल्या चर्चेत दिंडोरी तालुका शिक्षक संघाचे तालुका नेते धनंजय आहेर, अध्यक्ष आप्पासाहेब बच्छाव, सरचिटणीस सचिन वडजे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय वानले, मधुकर आहेर, एन.जे. आहेर, नंदकुमार गांगुर्डे, दत्तात्रय चौगुले, भाऊसाहेब बिरारी, श्रावण भोये, नियाज शेख, बाळासाहेब बर्डे, विलास पेलमहाले, विलास जमदाडे, मुकेश नांद्रे, भाऊसाहेब आहेर, चिंतामण भदाणे, प्रकाश सोनवणे, शरद डगळे, महेश शिरोडे, दिनेश देवरे, कल्याण कुडके, एकनाथ पाटील, दिगंबर बादाड, किरण शिंदे, धिरज शिंपी, गुलाब दातीर आदि शिक्षक
संघाचे पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. (वार्ताहर)

Web Title: Dindori district bank managers encircle