नियोजन बैठकांमध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी

By Admin | Updated: September 10, 2016 00:36 IST2016-09-10T00:36:05+5:302016-09-10T00:36:17+5:30

कळवण : १७ सप्टेंबरला नियोजनासाठी बैठकीचे आयोजन

The crowd of all-party Maratha leaders in the planning meetings | नियोजन बैठकांमध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी

नियोजन बैठकांमध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी

 कळवण : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करावा, यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कळवण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तालुक्यातील सर्वपक्षीय मराठा नेत्यांची गर्दी दिसून आली. दि. २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
दि. १७ सप्टेंबर रोजी कळवणला पुन्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये व मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उध्दव आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, मविप्रचे माजी उपसभापती विजय पवार आदिंनी बैठकीत व्यक्त केले.
कळवण तालुक्यातील गावागावांतून मराठा समाजबांधव नियोजन बैठकीला उपस्थित होते. कळवण, अभोणा, नवी बेज, निवाणे, भुसणी, बेलबारे, मानूर, गोसराणे, भगुर्डी, मोहमुख, भादवण, विसापूर, ककाणे, खेडगाव, बिजोरे, कळवण खुर्द, भेंडी, बगडू, पिळकोस, साकोरे, कळमथे, शिरसमणी, वाडी ,एकलहरे, नाकोडे, देसराणे, मोकभणगी, रवळजी आदि गावांतील मराठा बांधवांना नाशिक येथील मराठा मूक मोर्चासाठी खासगी वाहनांद्वारे घेऊन जाण्यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पवार, बेलबारे येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर भदाणे, भेंडीचे प्रमोद रौंदळ, पंकज रौंदळ, अभोण्याचे आबा सूर्यवंशी, भुसणीचे विष्णू सोनवणे, गोसराण्याचे सिकंदर मोरे, कळवण सोसायटीचे माजी सभापती शंकरराव निकम, बगडूचे रामा पाटील यांनी यावेळी बैठकीत दिली. जास्तीतजास्त समाजबांधवांना नाशिक येथील मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र भामरे यांनी, तर सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: The crowd of all-party Maratha leaders in the planning meetings