कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 17:49 IST2023-06-09T17:47:30+5:302023-06-09T17:49:18+5:30
गंगापूर रोडवर बुधवारी (दि.७) रोजी शाम काठे यांच्या कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा सोहळा पार पडला.

कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता
- राजू ठाकरे
नाशिक : लग्न सराई म्हटले की, खर्च आलाच. बरं लग्नात कन्यादानासाठी अथवा वधू वरांना भेट देण्यासाठी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोटार सायकल अथवा महागड्या चारचाकी वाहनांपर्यंत देण्यात येणाऱ्या सर्वच वस्तूंसाठी नेहमी चढाओढ पाहावयास मिळते. नाशिकच्या शामराव मोगल या शेतकऱ्याने मात्र खर्चीक गोष्टींना फाटा देत आपल्या मित्राच्या कन्येला कन्यादानातून ‘विषमुक्त शेतीचा’ संदेश दिला आहे.
गंगापूर रोडवर बुधवारी (दि.७) रोजी शाम काठे यांच्या कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा सोहळा पार पडला. यावेळी कन्यादान म्हणून त्यांना शामराव मोगल यांनी देशी गाय, विषमुक्त अन्न-धान्यासह भाजीपाला, चरीत्र ग्रंथ, फुल व फळझाडे आदी कन्यादान स्वरूपात देत कन्यादानातून ‘विषमुक्त शेतीचा’ संदेश दिला. पिंपळगांव येथील शेतकरी श्यामराव मोगल यांनी आपल्या १९ एकर शेतीवर सेंद्रीय पध्दतीने पीक घेत विषमुक्त शेतीचा प्रयोग राबविला आहे. यापूर्वी मोगल यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नातही अशाच प्रकारे विषमुक्त शेतीची साधने दिली होती.
- कन्यादानात महापुरूषांचे ग्रंथही...
देशी गाय (वासरी), देशी गायीचे विषमुक्त तुप, गुळ, द्राक्ष-मणुके, केळी, पपई, चिकु, कांदे, गहु, ज्वारी, बाजरी, नागली, ग्रंथ - श्रीमद भगवत गीता, ज्ञानेश्वरी भागवत चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, लोकमान्य टिळक, यांसह वडापासून तुळशीपर्यंतची सर्वच फुलझाडे, फळझाडे, सर्व शेतातील भाजीपाला विषमुक्त, चुल, जाते, रांजण आदी.