निकालाची प्रत घेऊन मंदिरात धडकणार

By Admin | Updated: April 1, 2016 00:15 IST2016-04-01T00:07:07+5:302016-04-01T00:15:02+5:30

तृप्ती देसाई : आधी शनि शिंगणापूर, नंतर त्र्यंबक

A copy of the result will be caught in the temple | निकालाची प्रत घेऊन मंदिरात धडकणार

निकालाची प्रत घेऊन मंदिरात धडकणार

 नाशिक : पुरुषांना प्रवेश असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश नाकारू नये, असे मत उच्च न्यायालयाने मांडल्यानंतर आता आपण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. या निकालाची प्रत हाती पडताच ती घेऊनच आपण शनि शिंगणापूर व त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वर मंदिरात सन्मानाने प्रवेश करू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देसाई यांनी शनि शिंगणापूर व त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांनाही प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ व नीलिमा वर्तक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर कायद्याने महिलांना समान अधिकार दिले असल्याने त्यांना मंदिरात प्रवेशाची परवानगी द्यायलाच हवी, असे मत न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर देसाई म्हणाल्या, न्यायालयाच्या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून, हा भूमाता ब्रिगेड व नारीशक्तीचा विजय आहे. न्यायालयाने याबाबत सरकारला दोन दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. सरकार याबाबत आपले मत शुक्रवारी (दि. १) मांडणार आहे. सरकारने औरंगाबाद खंडपीठापुढे आपले म्हणणे मांडताना महिलांच्या मंदिर प्रवेशाचे समर्थन केले होते. मुंबई उच्च न्यायालयातही सरकारला तेच मत कायम ठेवावे लागणार आहे. त्यानंतर न्यायालयाचा निकाल येईल. तो आल्यावर तातडीने या निकालाची प्रत हातात घेऊनच आपण आधी शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर व नंतर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात सन्मानाने प्रवेश करू. येत्या आठवड्याच्या आत त्र्यंबकेश्वर येथे धडकणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: A copy of the result will be caught in the temple