छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:57 IST2025-01-13T15:56:38+5:302025-01-13T15:57:26+5:30
माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते.

छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...
NCP Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ विस्तारापासून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडत आहेत. अशातच पक्षाचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या नव्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे, मात्र पक्षाने मला त्यांच्याबद्दल भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल," असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं.
भुजबळ आणि कोकाटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कृषिमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आल्यानंतर कोकाटे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते. अजित पवार यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असे आव्हान त्यांना नाव न घेता भुजबळांना दिले होते. त्यामुळे त्यानंतर दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमकी घडल्या.
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज असून, अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली होती. कोकाटे आणि भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. कोकाटे यांनी भुजबळांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, "खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीमध्ये उद्धवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. यावरून कोकाटे यांनी उद्धवसेनेला टोला लगावत तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे, कुणासोबत लढावे, उघडे लढावे की कपडे घालून, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे," असे कोकाटे म्हणाले.