छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:30 IST2025-05-20T18:28:52+5:302025-05-20T18:30:53+5:30

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चार झाली आहे. यात तीन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. 

Chhagan Bhujbal's entry into the cabinet increased Nashik's influence, but did the embarrassment of the guardian ministership also increase? | छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?

छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?

Chhagan Bhujbal Latest News: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळातून आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले. मंगळवारी (२० मे) त्यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने नाशिकला चौथे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. पण, भुजबळांच्या एन्ट्रीने पालकमंत्रिपदाचा पेच आणखी वाढला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश गृहीत धरला जात होता. मात्र, त्यांचा समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात केले गेले होते. विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून बंडखोरी केल्याने छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याची चर्चा होती. 

अखेर भुजबळांना संधी मिळाली

दरम्यान, भुजबळ हे नाराज होतेच, त्यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील नाराजी व्यक्तही केली होती. परंतु त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळीच आता भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. अखेरीस ती संधी त्यांना आता मिळाली आहे. 

वाचा >>'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

ओबीसींच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात. धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार असल्याने पक्षातील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच वाढणार

नाशिकमध्ये सध्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषधमंत्री नरहरी झिरवाळ हे तिघे कॅबिनेट मंत्री आहेत. आता भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचाही अद्याप तिढा कायम आहे. आता भुजबळ यांच्या एन्ट्रीमुळे पालकमंत्री पदासाठीही रस्सीखेच वाढणार आहे. यापूर्वी गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले होते. पण, रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या नंतर रद्द करण्यात आल्या. भुजबळांच्या एन्ट्रीने हा पेच आणखी वाढणार, असेच दिसत आहे. 

Web Title: Chhagan Bhujbal's entry into the cabinet increased Nashik's influence, but did the embarrassment of the guardian ministership also increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.