बांधकाम व्यावसायिक भुतडांवर फसवणुकीचा गुन्हा

By Admin | Updated: September 30, 2014 23:28 IST2014-09-30T23:27:28+5:302014-09-30T23:28:07+5:30

न्यायालयाची दिशाभूल : बनावट पावती सादर

Cheating Cem | बांधकाम व्यावसायिक भुतडांवर फसवणुकीचा गुन्हा

बांधकाम व्यावसायिक भुतडांवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : लोकन्यायालयात खटल्याची तडजोड झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये न देता ते दिल्याची बनावट पावती तयार करून न्यायालयात सादर करून कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय शिवनारायण भुतडा, वैशाली संजय भुतडा, संजय राजाभाऊ राठी, सुभाष पन्नालाल गांधी या चौघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, बांधकाम व्यावसायिक संजय भुतडा यांच्याविरुद्ध अशोक जवरीलाल सुराणा यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता़ हा दावा न्यायप्रविष्ट असताना व त्यांना कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश नसताना, तसेच ते होऊ नये यासाठी संजय भुतडा यांनी हा दावा लोकन्यायालयात दाखल केला़ तेथे सुराणा यांना १५ लाख रुपये देण्याचे भुतडा यांनी मान्य केले व दावा निकाली निघाला़
यानंतर संशयित भुतडा यांनी लोकन्यायालयात ठरल्याप्रमाणे सुराणा यांना १५ लाख रुपये न देता उलट त्यांच्याच नावाचे बनावट मागणीपत्र व पैसे परत केल्याची बनावट पावती तयार करून ती न्यायालयात सादर करून न्यायालयाचीच दिशाभूल तसेच सुराणा यांची फसवणूक केली़ याबाबत सुराणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुतडांसह तीन संशयितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Cheating Cem