गोवंश तस्कर 'पंखा'ने पोलिसांनाच संपवण्याचा केला प्रयत्न; नाशिकच्या पोलिसांनी गुजरातमधून उचलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:59 IST2025-10-15T19:57:46+5:302025-10-15T19:59:52+5:30
दोनवेळा पोलिस वाहनाला जबर धडक देत उलटवून टाकत पोलिस पथकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

गोवंश तस्कर 'पंखा'ने पोलिसांनाच संपवण्याचा केला प्रयत्न; नाशिकच्या पोलिसांनी गुजरातमधून उचलला
नाशिक : मालेगाव नाका चौफुली-मनमाड परिसरात संशयास्पद मालवाहू जीपचा ग्रामीण पोलिस पाठलाग करत असताना दोनवेळा पोलिस वाहनाला जबर धडक देत उलटवून टाकत पोलिस पथकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभोणा येथील कुख्यात सराईत गोवंश तस्कर संशयित आरोपी सरफराज ऊर्फ पंखा शेख याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने नवसारी जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या.
मनमाड पोलिसांच्या हद्दीत १० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या पोलिस वाहनाला (एम.एच१५ एचयू६२५७) जबर धडक दिली होती. यामुळे पोलिस जीप महामार्गावरील दुभाजकावर उलटून झालेल्या अपघातात दोन ग्रामीण पोलिस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. तेव्हापासून पोलिस संशयास्पद मालवाहू
जीपचा (एम.एच१७ एजी १७७३) व संशयित सरफराजचा शोध घेत होते; मात्र तो वेगवेगळ्या राज्यात स्वतःची खरी ओळख लपवून वास्तव्य करत पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी होत होता.
गुंगारा देण्यास यशस्वी होत होता. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना याबाबत सूचना दिल्या होत्या.
संधू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे मगर यांनी विशेष पथकाने गुजरातमधील चिखली गावात सापळा रचून शिताफीने सरफराज याला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी जप्त केली आहे.
'पंखा'च्या साथीदारांचा शोध सुरू
सरफराज ऊर्फ पंखा याने नाशिक जिल्ह्यात गोवंश तस्करीसाठी टोळी निर्माण केली होती का? त्याचे आणखी किती साथीदार या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत? याचा तपास आता ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच हद्दपारीचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मनमाडचे पोलिस निरीक्षक विजय करे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.