रावळगाव गटात इच्छुकांची भाऊगर्दी

By Admin | Updated: January 20, 2017 00:17 IST2017-01-20T00:16:53+5:302017-01-20T00:17:05+5:30

अस्तित्वाची लढत : रावळगाव गण अनुसूचित जमाती, तर वडेल नागरिकांचा मागास प्रवर्ग

The brother-in-law of Ravalgaon Group | रावळगाव गटात इच्छुकांची भाऊगर्दी

रावळगाव गटात इच्छुकांची भाऊगर्दी

शफीक शेख मालेगाव
तालुक्यातील रावळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने या गटात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीचा सामना होणार आहे. आजी-माजी मंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सरळ-सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसावी लागणार आहे.
माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कर्मवीर हिरे सेनेचे या गटावर वर्चस्व होते. जिल्हा परिषद निवडणुकीत रावळगाव गटातून हिरे गटाच्या अलका आखाडे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतिपदही भूषविले होते. हिरेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यास शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाला नंतर यश आले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेने या गटावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आदिंच्या पक्षनेतृत्वाला गटातील सत्ता खेचून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार यांनी आपल्या गटात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मदतीने केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु आपल्या हातातून गेलेला रावळगाव गटाचा गड पुन्हा मिळविण्यासाठी भाजपावासी झालेल्या हिरे गटाला कसरत करावी लागणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे सुरेश पवार यांनी जनराज्यचे समाधान अहिरे आणि राष्ट्रवादी- कॉँग्रेस युतीचे उमेदवार दत्तू वडक्ते यांचा पराभव केला होता. रावळगाव गटाचे जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
रावळगाव गणातूनच विजयी झालेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शरद कासार यांना पंचायत समिती उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. गेल्यावेळी शिवसेनेच्या मानसी धिवरे यांना पंचायत समिती सदस्यपदाची संधी मिळाली होती. वडेल गणातून सेनेच्याच छायाबाई माळी विजयी झाल्या होत्या. त्यांनी जनराज्यच्या अलका आखाडे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शीतल आखाडे यांचा पराभव केला होता. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रावळगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पक्षनेतृत्वाचा उमेदवारी बहाल करताना कस लागणार आहे. पक्षाला नाराज व बंडखोरीची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: The brother-in-law of Ravalgaon Group