नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:18 IST2025-09-18T16:14:12+5:302025-09-18T16:18:31+5:30
नाशिकमधील लासलगावमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्यामुळे तरुण जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार
Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. प्रेमप्रकरणातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे घडल्याचेही सांगितले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका अल्पवयीन मुलाची मुलीच्या नातेवाईकांनीच हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आली. लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली.
मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींनी मुलावर कोयत्याने रेल्वे परिसरात हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलाचे कुटुंबीय आक्रमक
मुलाची हत्या करण्यात आल्यानंतर मुलाचे नातेवाईक आक्रमक झाले. संतप्त नातेवाईकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या घटनेनंतर उद्या लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे.