कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 20:48 IST2023-03-14T20:47:37+5:302023-03-14T20:48:05+5:30
ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना
मनमाड (जि. नाशिक) : मनमाड - नांदगाव महामार्गावर जोंधळवाडी शिवारात मागून येणाऱ्या बोलेरोने कांद्याचा भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोलेरोमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
येथून जवळ असलेल्या जोंधळवाडी शिवारात मनमाड-नांदगाव महामार्गावर सोमवारी (दि.१३) रात्री दीड वाजेच्या सुमारास बोलेरो, ट्रॅक्टरचा अपघात झाला. चाळीसगाव येथून नाशिककडे बोलेरो गाडीत आठ जण प्रवास करीत होते. याच मार्गाने वेहेळगाव येथून नाना बोडखे हे कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर (एम एच २६ व्ही ८९९०) मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन जात होते. याच सुमारास चाळीसगाव येथून नाशिककडे निघालेल्या बोलेरो (एम एच १६ ए बी ११९२) गाडीने भरधाव वेगाने येत ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बोलेरो गाडीत असलेले कवळबाई जाधव, ईश्वर जाधव, तुळशीराम पवार, बळीराम राठोड, हरी राठोड, तुषार जाधव (सर्व रा. चाळीसगाव) हे सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीत असलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.