नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:21 IST2025-03-25T15:19:21+5:302025-03-25T15:21:58+5:30
Nashik News: सात आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ
-मिलिंद कुलकर्णी, (कार्यकारी संपादक, नाशिक)
राज्यात महायुती सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत. भाजप आणि शिंदेसेना हे वैचारिकदृष्ट्या समान विचारधारा असलेले पक्ष आहेत. तर, अजित पवार यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख पवार आणि त्यांचे ज्येष्ठ नेते विधाने आणि कृतीतून जाणवून देत असतात. नागपूर दंगलीसंदर्भात पवार यांनी अलीकडे केलेले विधान ताजे आहे. अशी स्थिती असली, तरी भाजप आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात याउलट स्थिती आहे. स्थानिक नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी शोधत असतात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिक बाजार समितीच्या सभापती पदावरून राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांना पायउतार करण्यात भाजपने मोलाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. ७ आमदार असताना राष्ट्रवादीला डावलून भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने राष्ट्रवादीमध्ये असंतोष होता. स्थगिती मिळाली असली, तरी राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे दोन्ही मंत्री आणि आमदारांनी फिरवलेली पाठ ही नाराजी कायम असल्याचे स्पष्ट दर्शवते.
हेही वाचा >>नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा
सिंहस्थ कामांना आता येईल वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला विलंब झाल्याची कबुली देत असतानाच आता युद्धपातळीवर कामे करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा हाच प्रमुख विषय होता. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला झालेली गर्दी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे राज्य शासनाने त्याच धर्तीवर तयारीला सुरुवात केली आहे.
तिथल्याप्रमाणे कायदा, प्राधिकरण करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. प्रशासकीय अधिकारी १८ तास काम करीत असून, सिंहस्थाचे सूक्ष्म नियोजन सुरू असल्याची शाबासकीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
नाशिकबरोबरच त्र्यंबकेश्वर येथे तयारी व गर्दीचे नियोजन ही आव्हानात्मक स्थिती राहणार आहे. विविध आखाड्यांचे साधू-महंत यांचे सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने राज्य शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या नियोजनाचा अनुभव असल्याने त्यांच्यावर मोठी मदार राहणार आहे.
मठाधिपतींना अखेर धक्का
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी चुंभळे यांनी अखेर धक्का दिला. पिंगळे यांची क्लृप्ती वापरत त्यांनी लढाई जिंकली. पिंगळे यांच्यासारखे अनेक मठाधिपती संस्थांवरील कब्जा सोडायला तयार नसतात. इतरांना नेतृत्वाची संधी दिली जात नाही.
नेतृत्वाची पुढील फळी तयार होऊ दिली जात नाही. खासदार राहिलेला नेता बाजार समितीचे सभापतीपद सोडायला तयार नाही, हे चित्र होते. लोकशाही मार्गाने त्यांचे पॅनल निवडून आले, तरीही त्याच संचालकांनी चुंभळे यांचे नेतृत्व स्वीकारत त्यांना धक्का दिला.
पिंगळे हे कायम सत्तेत राहणारे नेते आहेत. अजित पवार हे शरद पवार यांना सोडून सत्तेत सहभागी होताच, पिंगळे तिकडे गेले. त्यांना शह देण्यासाठी चुंभळे यांनीही भाजपची वाट चोखाळली. काही तोशीस न लागता बाजार समिती ताब्यात येत असेल, तर 'शतप्रतिशत'ची इच्छा असलेल्या भाजप अलिप्त कसा राहील?